शहरातील वसमत रस्त्यावरील शिवाजीनगरमधील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर झालेली ४६ पकी १३ अतिक्रमणे मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. यात १० पक्की घरे व तीन पत्र्याच्या शेडचा समावेश होता. ४६ पकी ३३ अतिक्रमणधारकांकडे न्यायालयाचा मनाई हुकूम असल्याने महापालिकेला आज कारवाई करता आली नाही. उद्या (बुधवारी) शिवाजी चौकात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
वसमत रस्त्याहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरवर महापालिकेची तीन ते चार एकर मोकळी जागा होती. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे झाली आहेत. या ठिकाणी सलून, चहाची हॉटेल, फíनचरचे दुकाने व काहींनी घरे बांधली होती. राष्ट्रीय महामार्गालगत जागा असल्याने अनेकांनी ही जागा भाडेतत्त्वावर दिली होती. या जागेत ४६ अतिक्रमणे थाटली आहेत. पकी ३३ अतिक्रमणधारकांनी न्यायालयातून मनाई हुकूम मिळवला, तर इतर १३ अतिक्रमणे जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली. शिवाजी नगरमधील श्री. रावके यांच्या घरापासून कब्रस्तानकडे जाणारा मोठा रस्ताच अतिक्रमणधारकांनी काबीज केला होता. हा रस्ताही मोकळा करण्यात आला.
सोमवारपासून शहरात नव्याने अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. ग्रँड कॉर्नर, फेरोज टॉकीज, मराठवाडा हायस्कूल, खंडोबा बाजार येथील अतिक्रमणे काढल्यानंतर मंगळवारी ही मोहीम शिवाजीनगरमध्ये पोहोचली. या ठिकाणी महापालिकेच्या मालकीची मोकळी जागा आहे. त्यावर झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास महापालिकेचे पथक जेसीबीसह पोहोचले. पत्राचे शेड असलेल्या अतिक्रमणधारकांनी आपले सामान हलविले, तर पक्की घरे पाडण्यासाठी जेसीबी चालवावी लागली. उद्या शिवाजी चौकात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली.