सांगली महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी तिरंगी लढत होत असून उपमहापौरपदासाठी काँग्रेसअंतर्गत वंदना कदम यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या गटाकडून बंडखोरी केल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी बुधवारी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापौर पदासाठी शेडजी मोहिते आणि उपमहापौरपदासाठी राजू गवळी यांची उमेदवारी दाखल झाली. तसेच स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने महापौरपदासाठी बाळासाहेब गोंधळी व उपमहापौरपदासाठी शिवराज बोळाज यांनी उमेदवारी दाखल केली.
काँग्रेसतर्फे विवेक कांबळे यांनी महापौरपदासाठी तर, प्रशांत पायगेंडा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी दाखल केली. महापौर, उपमहापौरपदाचे नाव बंद पाकिटातून नेते मदन पाटील यांनी खास दूतामार्फत महापालिकेत पाठविले. काँग्रेस नगरसेवकांची बठक गटनेते किशोर जामदार यांच्या उपस्थितीत झाली. या बठकीत ही नावे जाहीर करण्यात आली. त्यानुसार कांबळे आणि पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली.
तथापि, नाटय़पूर्ण घडामोडीनंतर माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या गटाच्या वतीने उपमहापौरपदासाठी अनुक्रमे वंदना कदम यांची उमेदवारी दाखल झाली. श्रीमती कदम यांच्या उमेदवारीस सूचक अतहर नायकवडी व अनुमोदक म्हणून आश्विनी कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण डॉ. कदम यांच्या गटाकडून उमेदवारी दाखल केली असल्याचे श्रीमती कदम यांनी सांगितल्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. यामुळे महापालिकेत संख्याबळात सक्षम असलेल्या सत्ताधारी काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी सदस्यांची शनिवार, ३१ जानेवारी रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे हे काम पाहणार आहेत.