26 November 2020

News Flash

आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये सेवाभावी संस्था रेडक्रॉसकडे देणार : राजेश टोपे

आधुनिक सुविधा असलेल्या १०२ क्रमांकाच्या पाचशे रुग्णवाहिका नव्याने घेणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

संग्रहित छायाचित्र

“राज्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये व त्या अंतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्र सेवाभावी संस्था अथवा रेड क्रॉस सोसायटी कडे हस्तांतर करण्याचा निर्णय दोन आठवड्यात घेण्यात येईल,” अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.

“व्यवस्थापनामध्ये बदल केल्यास चांगले परिणाम होतात याचे महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय हे उदाहरण म्हणता येईल. खूप प्रयत्न करूनही आरोग्यसेवा पोहोचविणे कठीण जाते. त्यामुळे अलीकडे राज्यशासनाने येथील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र हे रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर रुग्णालयाकडे व्यवस्थापनासाठी दिली आहेत. मानांकनात महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा वरचा क्रमांक आहे. नवीन व्यवस्थापनाने राज्यशासनाच्या माता संगोपन सारख्या अनेक योजना प्रभावी राबविल्या. उत्तम कामगिरीच्या जोरावर या रुग्णालयाने जिल्ह्यात वरचा क्रमांक प्राप्त केला,” अशी माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली.

“राज्यात आधुनिक सुविधा असलेल्या १०२ क्रमांकाच्या पाचशे रुग्णवाहिका नव्याने घेणार आहे. महाबळेश्वर येथे मोठ्या संख्येने सर्व स्तरातील पर्यटक येत असल्याने महाबळेश्वरला रुग्णवाहिका पुरविली जाईल. व्यवस्थापन बदलले तरी या या सेवाभावी संस्था व रेड क्रॉस सोसायटी यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार, रुग्णांसाठी औषधे, विज बिल व इतर खर्च हा राज्य शासनाकडून दिला जातो. ही रक्कम महिन्याच्या पहिल्या तारखेला कशी मिळेल त्याची व्यवस्था केली जाईल,” असंही ते म्हणाले. ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे परंतु तेथील अतिदक्षता विभाग सुरू नाही त्या ठिकाणचा अतिदक्षता विभाग सुरू करावा व त्यासाठी बिल आकारण्याची परवानगी संस्थांना देण्याचा विचार आहे. प्रशासन व ग्रामीण रुग्णालय यांच्यात केवळ एका वर्षाचा करार केला जातो पुढील पाच वर्षासाठी हे रुग्णालय रेड क्रॉस सोसायटी व संस्थेकडेच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:12 pm

Web Title: tribal and rural hospitals to be handed over to red cross maharashtra health minister rajesh tope jud 87
Next Stories
1 “शाळा सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, याउलट…”
2 महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल
3 अखेर न्यायालयांचे स्थलांतर
Just Now!
X