पालघर जिल्ह्य़ात शेकडो कुटुंबांचे स्थलांतर

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊन सर्वत्र जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.  त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे पुन्हा एकदा मोठे स्थलांतर सुरू झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा, तलासरी  या तालुक्यांतील दुर्गम व आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेली आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी पालघर, बोईसर, वसई-विरार, भिवंडी, गुजरात आदी ठिकाणी आपल्या कुटुंबांसह स्थलांतरित होत आहेत. ते या शहरांच्या ठिकाणी मोकळी जागा बघून त्या ठिकाणी ताडपत्रीचे भोंगे बांधून राहात आहेत. सद्य:स्थितीत स्थानिक पातळीवर कोणतेच काम उपलब्ध नसताना पोटाची खळगी भरण्यासाठी ही हजारो आदिवासी कुटुंबे  गाव पाडे सोडून रोजगाराच्या शोधात वणवण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पाडे ओस पडू लागले आहेत.

करोनाकाळात  गेल्या अनेक महिन्यांपासून या कामगारांच्या हाताला काम नव्हते. उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत होती. आता जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र स्थलांतरित मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.  रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील आदिवासी मजूर स्थलांतर करीत असले तरी काहींच्या हाताला आजही रोजगार मिळत नाही. सद्य:स्थितीत कामगार नाक्यांवर गर्दी पाहायला मिळत असली तरी  निम्म्या हातांनाही कामे मिळण्याची शक्यता नाही. जी मजुरी मिळेल त्या मजुरीवर काम करणे भाग पडत आहे. विविध मजुरी कामे करणाऱ्या आदिवासी कुटुंबासह  परराज्यातील  मजुरांचीही परवड होत आहे.  दोन दोन दिवस मजुरीसाठी वणवण करावी लागतानाचे भयावह चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे पावसाळा सोडून इतर दिवस कामाच्या शोधात भटकत असतात. ज्या ठिकाणी मुबलक काम उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपला डेरा टाकून समूहाने राहतात. मात्र कोरोनामुळे बहुतांश व्यवसाय ठप्प पडल्याने काम शोधून त्याद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.  कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.

आर्थिक साहाय्य मिळावे यादृष्टीने शासनाने त्यांच्यासाठी खावटी योजना पुनर्जीवित केली असली तरी त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ अजूनही मिळालेला नसल्याने या हजारो आदिवासी कुटुंबांची उपेक्षाच होत आहे.

स्थलांतरित जागेत समस्यांनी त्रस्त

आदिवासी कुटुंबे ज्या शहरांच्या ठिकाणी राहात आहेत ती जागा राहण्यायोग्य नसते. याचबरोबरीने तेथे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणारे कोणी नसते. त्यामुळे  आजार बळावण्याची शक्यता आहे. राहत्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध नसते. त्यामुळे याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या मजूरवर्ग आदिवासी कुटुंबातील महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल कोणती जनजागृती नसल्याने त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.