रोजगार हमीतील फोलपणा; रोखीसाठी वीटभट्टी, वाडी मजुरीकडे कल

डहाणू: करोना काळात रोजगार बुडाल्याने तसेच खेडेगावात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे डहाणू, तलासरी, विक्रमगड येथील परिसरातील अनेक मजूर कुटुंबीय परराज्यातील शहरांचा आश्रय घेऊन वीटभट्टी, वाडी मजुरी, विविध कारखान्यामध्ये मिळेल ते काम करण्यासाठी जाताना दिसत आहेत. रोजगार हमीची कामे या परिसरात अत्यंत कमी असल्यामुळे परगावी जाण्याची पाळी मजुरांवर आली आहे.

करोना काळात शाळा बंद असल्याने परराज्यात तसेच इतर ठिकाणी कामावर गेलेल्या इयत्ता १० वी १२ वीचे विद्यार्थी मुळगावी परतलेले नाहीत. त्यामुळे शिक्षणापेक्षा पोटापाण्याचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. डहाणू शहर, तलासरी, विक्रमगड हे तालुक्याची ठिकाणे असून त्यामध्ये काही आदिवासी खेडय़ांसह छोटीमोठी खेडी प्रामुख्याने जास्त आहेत. कुठलीही औद्योगिक वसाहत, छोटेमोठे कारखाने अजूनतरी अस्तित्वात नसल्यामुळे मजूरांना मोठय़ा प्रमाणावर शेतीच्या कामावरच अवलंबून राहावे लागते.

यावर्षीचा हंगाम लवकरच आटोपल्यामुळे मजुरांना दरवर्षीप्रमाणे रोजगार उपलब्ध होत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व याच कारणाने मजुरांनी दुसऱ्या राज्यात किंवा इतरत्र कोठेही जाण्याची तयारी केली आहे. वसई, विरार तसेच मीरा-भाईंदर, ठाणे, भिवंडीसह गुजरात राज्यात इमारती बांधण्याचे काम सुरू आहे.

काहींनी ठाणे, गुजरातकडेही मोर्चा वळविला आहे. तरुण मजूर वर्ग मात्र मुंबई शहराकडे वळल्याचे दिसून येते. पुढील हंगाम सुरू होईपर्यंत तेथेच राहणे त्यांनी पसंत केले आहे. शासनाने रोजगार हमीची कामे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून दिल्यास ही पाळी उद्भवणार नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायतस्तरावर रोजगार हमीची कामे सुरू असतात. परंतु त्याचा मोबदला मिळण्यास लागणाऱ्या विलंबामुळे लोक थांबायला तयार नसतात. त्यामुळे रोख रकमेच्या मोबदल्यासाठी परगावी कामासाठी जाण्याचा लोकांचा कल दिसून येतो.

बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारी

रोजगार हमीतून केलेल्या कामाची पाहणी करणे, मोजमाप करणे आणि त्यानंतर जॉबकार्ड जमा करणे  व मोबदला अदा करणे यामध्ये तीन महिन्याचा कालावधी जातो. त्या दरम्यान दुकानात उधारीवर आणलेल्या सामानाची परतफेडही करता येत नाही. दुकानदार पैशासाठी तगादा लावतो.

सचिन पुजारी, सामाजिक कार्यकर्ता