05 March 2021

News Flash

आदिवासी पाडे असुविधांच्या फेऱ्यात

एखादी व्यक्ती आजारी असल्यास डॉक्टर किंवा रुग्णवाहिका बोलावणेही कठीण होते.

|| विजय राऊत

जव्हारमधील दुर्गम भाग ‘संपर्क क्षेत्रा’बाहेर

कासा : एकीकडे केंद्र सरकारकडून ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न दाखवले जात आहे, तर दुसरीकडे जव्हार तालुक्यातील अनेक गावे, आदिवासी पाडय़ांना मोबाइल वा इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याचे दिसून आले आहे. दुर्गम भागांतील ही गावे व पाडे अजूनही मोबाइल ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ असून एखादा महत्त्वाचा निरोप पाठवण्यासाठी माणसांचाच वापर करावा लागत आहे.

जव्हार तालुक्यातील गुजरात, दादरा नगरहवेली यांच्या सीमांना जोडून असलेली वांगणी, रुईघर बोपदरी यांसह १० महसुली गावे आणि ३५ पाडय़ांची मिळून ६ हजार २०० लोकसंख्या आहे. या आदिवासी गावपाडय़ांमध्ये कोणत्याही मोबाइल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे ई-मेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप या गोष्टी दूरच राहिल्या; पण कुठलाही तात्काळ संपर्क करायचा असेल तर या भागांत एखाद्याकडून निरोप दुसरीकडे पाठवला जातो. त्यामुळे महत्त्वाचा निरोप वेळेवर पोहोचत नसल्याचेही दिसून आले आहे. एखाद्याला तात्काळ दूरध्वनीवर संपर्क करायचा असेल तर २० किलोमीटर अंतरावर दादरा नगरहवेलीला जावे लागते. त्यामुळे या गावांमधील काही जणांकडे मोबाइल असले तरी ते बिनकामाचे आहेत.

सीमा भागांतील ही गावे खोल दऱ्याखोऱ्यात वसलेली आहेत. त्यामुळे तिथे मोबाइलचे नेटवर्क मिळत नसल्याने आरोग्यसंदर्भातील अडचणी भेडसावतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास डॉक्टर किंवा रुग्णवाहिका बोलावणेही कठीण होते. १०८ किंवा १०४वर संपर्क करून रुग्णवाहिकेची मागणी करणारी योजना येथे फोल ठरली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांची कसरत

नेटवर्क नसल्याने या भागांत शासनाची कामे करणाऱ्या यंत्रणांना मोठय़ा कसरतीने कामे करावी लागत आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आरोग्य विभागाचे हिवताप निवारण कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आश्रमशाळा शिक्षक, अन्य सरकारी क्षेत्रात कामे करणाऱ्या शासनाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती देणे, पुरविणे कठीण झाले आहे. शिवाय कुठलेही नेटवर्क नसल्याने अनेक सुविधांपासून मुकावे लागत आहे.

या भागांमध्ये मोबाइल नेटवर्क येत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावांमध्ये एखादा रुग्ण आजारी पडला तर १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यासाठीही जवळपास १८ ते २० किलोमीटर अंतरावर जाऊन दूरध्वनी करावा लागत आहे किंवा निरोप देऊन रुग्णवाहिका मागवावी लागत आहे. या भागांमध्ये आश्रमशाळा आरोग्य पथक असून मोबाइल नेटवर्क येत नसल्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे

– रतन बूधर, माजी जिल्हा परिषद सदस्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:10 am

Web Title: tribal pada in the round of inconvenience akp 94
Next Stories
1 वाढवण बंदराला विरोध कायम 
2 दोन तप सुविधांचा जप
3 ‘बळीराजा नको करु आत्महत्या’ ही कविता सादर करणाऱ्या मुलाच्या वडिलांचीच आत्महत्या
Just Now!
X