News Flash

आता आदिवासींना शिधापत्रिकेवर तूरडाळ, खाद्यतेल

कुपोषणाने प्रभावित तालुक्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.

नाशिक

१० जुलैपासून अंमलबजावणी

वाडा : पांढरी शिधापत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता शिधापत्रिकेत दोन किलो तूरडाळ आणि एक किलो खाद्य तेल दिले जाणार आहे. पालघर जिल्ह्य़ातील जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुके कुपोषणाने प्रभावित तालुक्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.

आवश्यक पोषण घटकांच्या अभावामुळे आदिवासी मातांमध्ये कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे हे श्रमजीवी संघटनेने सरकारदरबारी मांडले होते. याबाबत अनेक प्रखर आंदोलनेही झाली होती. अखेर या योजनेला शासनाचा हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या १० जुलै २०१९ पासून या योजनेचा शुभारंभ  होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा मुद्दा २०१६ साली पुन्हा ऐरणीवर आला होता. श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रस्त्यावर उतरून रान उठवले होते. दुसऱ्या बाजूला याबाबत उपाययोजना काय असाव्यात याबाबतही श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित हे सरकारशी चर्चा करत होते.

आदिवासींच्या भोजनात आवश्यक जीवनसत्त्व असलेले अन्नपदार्थ असावेत अशी मागणी करत रेशनवर खाद्य तेल आणि तूरडाळ असावी ही मागणी करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पालघर जिल्हाधिकारी आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा सचिवांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरही संघटनेने वारंवार याबाबत पाठपुरावा केला होता.

याबाबत आता शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून जव्हार आणि मोखाडय़ात या योजनेचा प्रयोगिक तत्त्वावर शुभारंभ होणार आहे. सर्व केशरी, पिवळ्या, अंत्योदय शिधापत्रिकाधारक आदिवासी कुटुंबाना याचा लाभ मिळणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 1:09 am

Web Title: tribal people will get tur dal edible oil on ration cards zws 70
Next Stories
1 वसईतील वीज समस्यांवर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात मंथन
2 स्मार्ट कार्डसाठी रांगेची शिक्षा
3 विजेची सर्वाधिक मागणी वसईत
Just Now!
X