News Flash

आदिवासींच्या प्रतिप्रश्नांनी नक्षलवाद्यांची डोकेदुखी वाढली

गेल्या तीन दशकांपासून प्रभावात असलेले स्थानिक आदिवासी सुद्धा आता बैठकांच्या दरम्यान प्रतिप्रश्न उपस्थित करू लागल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात अस्वस्थता आहे.

| September 28, 2013 01:30 am

गेल्या तीन दशकांपासून प्रभावात असलेले स्थानिक आदिवासी सुद्धा आता बैठकांच्या दरम्यान प्रतिप्रश्न उपस्थित करू लागल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात अस्वस्थता आहे. चळवळीतील ज्येष्ठ सदस्य एकीकडे जनाधार कमी झाल्याबाबत चिंता व्यक्त करत असताना कार्यक्षेत्रात वावरणाऱ्या नक्षलवाद्यांची या प्रतिप्रश्नांमुळे डोकेदुखी वाढली आहे.
अलीकडेच झालेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत चळवळीच्या घसरत्या जनाधारावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. तशा आशयाचा ठराव सुद्धा समितीने केला आहे. हा जनाधार वाढवण्यासाठी आणखी नव्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे या ठरावात नमूद आहे. या पाश्र्वभूमीवर आजवर कायम या चळवळीच्या प्रभावात असलेल्या भागातून समोर येणारी माहिती नक्षलवाद्यांच्या अस्वस्थतेत भर टाकणारी आहे. शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली हा तालुका या चळवळीच्या सर्वाधिक प्रभावात असलेला भाग म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात नक्षलवाद्यांना प्रतिप्रश्न विचारणाऱ्या अनेक घटना आता समोर येत आहेत. एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनीही या घटनांना दुजोरा दिला आहे.
या भागात सक्रीय असलेल्या प्लॉटून क्रमांक ३ चा प्रमुख असलेल्या विलास कोल्हा या जहाल नक्षलवाद्याने ऑगस्टमध्ये सर्व शाळा व शासकीय इमारतींवर काळे झेंडे फडकवा, हे सांगण्यासाठी दुर्गम भागात बैठकांचे आयोजन केले होते. यापैकी बहुतांश बैठकांमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक आदिवासींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकवण्यास नकार दिला. याच भागातील कोटमी हे गाव नक्षलवाद्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाते. या गावातील आदिवासींनीही बैठकीत केलेला विरोध प्रत्यक्ष स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सुद्धा कायम ठेवला. या दिवशी नक्षलवादी काळे झेंडे घेऊन गावात आल्यावर त्यांना आदिवासींनी हा झेंडा फडकवू दिला नाही. याच प्लॅटूनने जाराबंडी भागात सुद्धा अशीच बैठक आयोजित केली होती. त्यात सहभागी झालेल्या आदिवासींनी १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला काळे झेंडे फडकवून काय साध्य होणार, असा प्रश्न विलास कोल्हाला विचारला.
साधारणपणे अशा बैठकांमध्ये नक्षलवाद्यांसमोर बोलण्याची हिंमत कुणीच करत नाही. जो बोलेल त्याचा जीव धोक्यात येतो, हे ठावूक असूनसुद्धा आता आदिवासी प्रतिप्रश्न उपस्थित करू लागले आहेत, असे नलावडे यांनी सांगितले. याच तालुक्यातील बुरगी या गावातील आदिवासी नक्षलवाद्यांच्या सततच्या जेवण देण्याच्या मागणीला कंटाळले आहेत. या गावातील बहुसंख्य कुटुंबे दारिद्रय़रेषेखालील आहेत. वारंवार जेवण देऊन वैतागलेल्या या आदिवासींनी अखेर एका पुजाऱ्याकडे धाव घेतली. काही मंत्रतंत्र करून गावात येणाऱ्या नक्षलवाद्यांना रोखता येणार नाही का, असा प्रश्न या आदिवासींनी पुजाऱ्याजवळ उपस्थित केला. पोलिसांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊ नका, असेही नक्षलवाद्यांचे आदेश आहेत. आता या स्पर्धामध्ये केवळ आदिवासींच नाही, तर त्यांच्यातील महिलांचे संघ सुद्धा भाग घेऊ लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:30 am

Web Title: tribal re questioning increase naxal headaches
टॅग : Naxal,Naxalite
Next Stories
1 आमदार राजेश क्षीरसागर यांना अटक, कोठडीत सत्याग्रह
2 कॅनडातील विद्यापीठाचा पुरस्कार हजारे यांना प्रदान
3 जिल्ह्य़ात केंद्रीय पथकाकडून तपासणी होणार
Just Now!
X