स्वच्छ पाणी, पक्का रस्ता आणि विजेअभावी विकास खुंटला

विजय राऊत, लोकसत्ता

कासा : जव्हार तालुक्यातील हुंबरणे या आदिवासी पाडय़ाला स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही मूलभूत नागरी सेवा, सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गरोदर महिला, विद्यार्थी व रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. देशात एकीकडे आधुनिकतेच्या गप्पा मारल्या जात असताना हुंबरणे पाडा वाळीत पडला असल्यासारखे चित्र आहे.

तालुक्याच्या मुख्यालयापासून साधारणपणे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत हा पाडा वसलेला आहे. इथे ३५ घरे असून ५०० ते ५५० लोकसंख्या आहे. परंतु एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येला मात्र पायाभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. इथे जाण्यासाठी धड रस्ताही नाही. काटेरी आणि दगडगोटय़ांची खडतर वाट तुडवून जाताना गावकरी, विद्यार्थी आणि महिलांचे खूपच हाल होतात. दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने पायपीट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

पावसाळ्यात तर ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. अशा प्रसंगी आजारी व्यक्तीला आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यासाठी अक्षरश: झोळीचा वापर करावा लागतो. अपुऱ्या सोयी- सुविधांमुळे या वर्षभरात आत्तापर्यंत तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ता नीट नसल्याने सायकल किंवा दुचाकीचाही वापर शक्य नाही. त्यामुळे नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ येते. अनेकांना तर रोजगारालाही मुकावे लागले आहे. इथे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने पायीच जावे लागते.

दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाण्याची. फेब्रुवारी ते जून महिन्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय गावात नसल्याने येथील महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते. अर्धा ते एक तास चालत जाऊन या महिलांना खोल दरीत उतरून पाणी घेऊन वर चढावे लागते.

गावात वीज नसल्याने आधुनिक जीवनशैलीपासून गावकरी वंचित आहेत. टाळेबंदीच्या व नंतरच्या काळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख हलता ठेवण्यासाठी मोबाइल फोनचा आधार घेतला जात असताना येथील विद्यार्थ्यांना अंधारात चाचपडावे लागत आहे.

शासनाने गावोगावी शंभर टक्के वीज मिळते असे गृहीत धरून शिधावाटप दुकानांवर रॉकेलचे वाटप बंद केले आहे. त्यामुळे हुंबरणे या आदिवासी पाडय़ातील गावकऱ्यांना खाद्यतेलाचे दिवे लावावे लागत आहेत.

आमच्या पाडय़ामध्ये कित्येक वर्षांपासून रस्ता, वीज व पाणी या सुविधांची वानवा आहे. आम्ही याबाबत अनेकदा जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले आहे; परंतु आमच्या समस्या मात्र सुटत नाहीत.

राजेश वांगड, ग्रामस्थ, हुंबरणे

सदर गावात कोणत्या सोयी-सुविधा आहेत याबाबत आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.

बाळा भला, तहसीलदार, जव्हार