News Flash

आदिवासींच्या वाटय़ाला अजूनही गुलामगिरीचे जीणे – पी. साईनाथ

आदिवासी भागात विविध प्रकारच्या खाणी आहेत. परंतु, त्या खाणींवर आदिवासींची हुकूमत नाही. या खाणी आता धन दांडग्यांच्या ताब्यात असून आदिवासी गुलामगिरीत राहत आहेत, असे प्रतिपादन

| January 22, 2013 01:32 am

आदिवासी भागात विविध प्रकारच्या खाणी आहेत. परंतु, त्या खाणींवर आदिवासींची हुकूमत नाही. या खाणी आता धन दांडग्यांच्या ताब्यात असून आदिवासी गुलामगिरीत राहत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथे कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘दीपस्तंभ’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमास ट्रस्टचे अनुराधाताई मालुसरे, माजी आमदार जे. पी. गावित, शकुंतला जायभावे, संजय मालुसरे, सुनीता मालुसरे, सुनीता जायभावे, श्रीधर देशपांडे आदी उपस्थित होते. अहमदनगर येथील किसान सभेचे अध्यक्ष यादवराव नवले यांना उत्कृष्ट आदिवासी कार्यकर्ता, पुणे येथील सीटूचे पदाधिकारी वसंत पवार यांना उत्कृष्ट कामगार कार्यकर्ता, ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकार तर रायगड जिल्ह्यातील दासगाव येथील आर. बी. मोरे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास उत्कृष्ट शिक्षण संस्थेचा पुरस्कार देण्यात आला. ११ हजार रूपये, स्मृतिचिन्ह व मालुसरे यांचे ‘अनासक्त कर्मयोगी’ हे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मोरे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक देवयानी मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी साईनाथ यांनी आदिवासी हा सर्वात त्यागी घटक असल्याचे नमूद केले. इंग्रजांना विरोध करणारा, सर्वासाठी लढणारा बिरसा मुंडा हा आदिवासीच होता. ज्या आदिवासींनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय मिळाले, असा प्रश्न साईनाथ यांनी उपस्थित केला. मुंबईसारख्या शहरांमध्ये चोवीस तास अखंडपणे पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी ज्या आदिवासी भागातून नेले जाते, त्या ठिकाणच्या स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ज्यांनी पाण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्या भागात नळ व पाणीही नाही अशी बिकट स्थिती आहे. शासन आदिवासींसाठी विविध योजना असल्या तरी त्याचे लाभ त्यांना पूर्णपणे मिळत नाहीत. उलट या योजनांची अमलबजावणी करणाऱ्या घटकाचा फायदा होत असून त्या योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे आदिवासी भागाच्या विकास प्रक्रियेला खीळ बसल्याची खंत पी. साईनाथ यांनी व्यक्त केली.
अनुराधाताई मालुसरे यांनी नानांच्या कार्याचा आढावा घेतला. नाना हे कुशल संघटक व माणूसपण जपणारे होते. प्रत्येक दु:खी व पीडितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्याग केल्याचे नमूद केले. माजी आमदार जे. पी. गावित यांनी आदिवासी बांधवांनी आता जागे होण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी पुरस्कार्थीनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्यास आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

‘माध्यमांमध्ये जनतेच्या हक्कांची अधिक चर्चा आवश्यक’
प्रसिद्धीमाध्यमे ही उद्योगपतींच्या हातात असून माध्यमांमध्ये जनतेच्या हक्कांविषयी, त्यांच्या समस्यांविषयी अधिकाधिक चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी नाशिक येथे मांडले. कॉम्रेड नाना मालुसरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालिमार चौकातील आयएमए सभागृहात ‘समाज आणि पत्रकार : बदलत्या कक्षा आणि जबाबदाऱ्या’ या विषयावर  त्यांचे व्याख्यान झाले.
समाजाविषयी पत्रकारांची बांधीलकी दिवसेंदिवस कमी होत असल्याबद्दल साईनाथ यांनी चिंता व्यक्त केली. पत्रकारिता ही एक चळवळ असून पत्रकारांनी समाजाविषयीची बांधिलकी जपणे गरजेचे आहे. पत्रकाराने व्यावसायिक जबाबदाऱ्यांबरोबरच मानवता हा दृष्टिकोन ठेवून जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असेही साईनाथ यांनी ठणकावले. निवडणुकांप्रसंगी निर्माण होणाऱ्या पेड न्यूजचा तसेच माध्यमांमध्ये आलेल्या कॉर्पोरेट संस्कृतीचाही त्यांनी समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत सोनवणे यांनी केले. या वेळी डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे व शकुंतला जायभावे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 1:32 am

Web Title: tribale still living slavery life
Next Stories
1 विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये डॉक्टरेट मिळविण्याची लाट..
2 दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री
3 दुष्काळामुळे जलसिंचन योजनांना गती द्यावी – शरद पवार
Just Now!
X