नांदेड : देशाचे माजी पंतप्रधान आणि सध्याच्या आधुनिक युगाचे शिल्पकार भारतरत्न राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करतानाच जिल्हा आणि शहर काँग्रेसने राजीव सातव व इतर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्याचा सोपस्कार शुक्रवारी पूर्ण केला. पक्षाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात मात्र श्रद्धांजलीचा उल्लेख नाही!

राजीव सातव यांच्याबाबतीत स्थानिक काँग्रेस समितीने दाखविलेल्या अनास्थेची जिल्हाभर काँग्रेस कार्यकर्त्यांंत चर्चा होत आहे. जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांच्याकडे हा विषय गेल्यानंतर, आम्ही जिल्हा कार्यालयात शुक्रवारी श्रद्धांजलीपर कार्यक्रम ठेवला असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांंजवळ सांगितले. पण दिवंगत पंतप्रधान आणि माजी पक्षाध्यक्षास अभिवादन करण्याच्या कार्यक्रमातच खा. सातव तसेच माजी खासदार गंगाधर कुंटूरकर, रावसाहेब अंतापूरकर व संभाजीराव मंडगीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, असे काँग्रेसच्या दुसऱ्या पत्रकातून स्पष्ट झाले.

काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती इतर पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कळविली होती. त्यात राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्याबाबत कोणताही उल्लेख नव्हता.

काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्ह्यतील पदाधिकाऱ्यांच्या  एकंदर वर्तनाबद्दल भाजपच्या स्थानिक खासदारानेही आश्चर्य व्यक्त केले. उज्ज्वल राजकीय भविष्य असलेला एक तरुण नेता गमविल्याचे दु:ख त्या पक्षाच्या प्रमुखांनी व्यक्त केले. पण नांदेडमध्ये त्याचे काही नाही, टोलाही भाजप खासदाराने लगावला.

माजी पदाधिकारी अनभिज्ञ

काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आल्यानंतर पक्षाच्या दोन्ही शाखांतर्फे मास्क आणि अन्न वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. काही माजी पदाधिका?ऱ्यांना वरील कार्यक्रमाबद्दल कळविण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले.