बलात्कारासारख्या खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस शहर पोलिसांनी सापळा रचून जिल्हा न्यायालयाच्या आवारात ताब्यात घेतले. तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रोकड घेत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.
शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना गंडवून खोटे गुन्हे दाखल करणारी खंडणीखोर महिला अखेर गजाआड झाली. या महिलेच्या मुलांवरही जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. तक्रारदार निवृत्त कृषी अधिकाऱ्याला महिला आरोपीने बलात्काराच्या खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर २ लाख रुपये खंडणी या महिलेने तक्रारदाराकडे मागितली. याबाबत तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी साडेबाराच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे, सहायक महिला पोलीस निरीक्षक सानप, पोलीस नाईक धोत्रीकर, महिला पोलीस नाईक मिसाळ व शिपाई पायाळे यांच्या पथकाने न्यायालयाशेजारी सापळा रचला. या वेळी तक्रारदाराकडून दोन लाखांपकी २० हजार रुपयांची खंडणी रोख स्वरूपात घेताना महिलेस पकडले. या महिलेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वीही शहरात असे अनेक प्रकार झाले असल्याची शक्यता वर्तविली जाते. तक्रारदाराने पुढे येऊन पोलिसात या महिलेविरुद्ध तक्रार दिल्यामुळे तिचा गोरखधंदा चव्हाटय़ावर आला. पोलिसांनी तत्काळ आरोपी महिलेला गजाआड केल्यामुळे या प्रकरणात पूर्वी फसविल्या गेलेल्या पीडितांची माहितीही समोर येण्याची शक्यता आहे. कायद्याचा गरवापर करून सर्वसामान्य नागरिकांच्या देवभोळेपणाचा गरफायदा घेणारी टोळीच कार्यरत आहे काय? असा तपासही पोलीस करीत आहेत.