गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गरिबांवर अन्याय करणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला. लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन केले. त्यांच्या अथक संघर्ष आणि योगदानामुळेच आज राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आली. प्रत्येक माणसाला गोपीनाथ मुंडे माझे नेते आहेत असे वाटत असे. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे लोकविलक्षण आणि कल्पनेपलीकडचे होते. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांसाठी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंडे हे जिगरबाज होते. त्यांच्या संघर्षांमुळेच आम्ही सत्तेत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगड (ता.परळी) येथे शनिवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध लाभार्थ्यांना साहित्य व मदत वाटप करण्यात आली. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री बबनराव लोणीकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, आमदार विनायक मेटे, संयोजक ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. या वेळी अपंगांना साहित्य, महिला बचतगटांना अर्थसाहाय्य, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदतीचे वाटप करण्यात आले. या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, दिवंगत मुंडे यांनी आयुष्यभर गरिबांवर अन्याय करणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात कायम संघर्ष केला. उपेक्षित आणि वंचित असलेल्या माणसाला आवाज दिला. सर्वसामान्य तरुणांना राजकारणात संधी दिली. मलाही राजकीय जीवनात मोठी मदत त्यांनी केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकविलक्षण व कल्पनेपलीकडचे होते. समाजातील प्रत्येक माणसाला, गरिबाला गोपीनाथ मुंडे हे माझे नेते वाटत असे. लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी १९९५ला राज्यात सत्ता परिवर्तन केले. त्यांचा सततचा संघर्ष आणि योगदानामुळेच आज केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे मुंडेंचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही सरकार कटिबद्ध आहेत.

परळी-नगर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण होईल आणि काही वर्षांत याच रेल्वेतून गोपीनाथगडावर लोक येतील. दिवंगत मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. खेडय़ांच्या विकासासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांना ग्रामविकास खाते दिले होते, मात्र त्यांच्या अकाली जाण्याने प्रचंड दु:ख झाले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत मुंडे यांच्या निधनानंतर आता काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांचे स्मरण करून, प्रेरणा घेऊन राज्य सरकार काम करत आहे. आयुष्यभर शेतकरी, दलित, उपेक्षितांसाठी मुंडेंनी संघर्ष केला, त्यामुळे तीन वर्षांत सरकारच्या माध्यमातून आम्ही या वर्गाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंडे यांनी अत्यंत कष्टातून आपले नेतृत्व उभे करताना अनेकांना घडवल्याचे दानवे म्हणाले. तर गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खासदार, आमदार घडवणारा कारखाना होता असे गौरोवदगार बबनराव लोणीकर यांनी काढले. महादेव जानकर यांनी मुंडेंनी फाटक्या माणसाला सत्तेचे स्वप्न दाखवले. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. सदाभाऊ खोत यांनी दिवंगत मुंडे यांच्यामुळेच आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळाल्याचे सांगितले.