येथील २ महाराष्ट्र नेव्हल युनिटचा कॅडेट शुभंकर शिंदे याची दिल्ली येथे येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झाली आहे. याचबरोबर पंतप्रधान रॅली संचलन आणि या वर्षीचा राज्य पातळीवरील सवरेत्कृष्ट नौदल कॅडेट म्हणूनही त्याची निवड झाल्यामुळे एकाच वर्षी तिहेरी यश संपादनाचा विक्रम त्याने नोंदवला आहे.
शालेय जीवनापासून शुभंकर एनसीसीच्या नौदल विभागात असून राज्य पातळीवरील सवरेत्कृष्ट कॅडेटची निवड करण्यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत त्याने राज्याच्या अन्य भागातून आलेल्या कॅडेटना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. हे यश मिळवणारा तो वयाने सर्वात लहान कॅडेट आहे. नौदलातर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या युवक देवाण-घेवाण कार्यक्रमासाठीही त्याच्या नावाची शिफारस झाली आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनापाठोपाठ २८ जानेवारी रोजी पंतप्रधान रॅली संचलन होते. त्यामध्येही शुभंकर भाग घेणार आहे. भावी काळात नौदलातच करिअर करण्याची त्याची महत्ताकांक्षा आहे.
येथील नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर अमितकुमार सन्याल आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील एनसीसी ऑफिसर ले. डॉ.किशोर सुखटणकर यांनी शुभंकरला मार्गदर्शन केले आहे.