मुलताई जवळील घाटात कार पेटवून दोन लहान मुलींसह पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीण मनवरने पोलिसांना आतापर्यंत सांगितलेल्या कहाणीवर विश्वास बसलेला नाही. कबुलीजबाबातील विसंगती आणि एचआयव्ही चाचणीसंदर्भातील खुलाशांमुळे पोलिसांनी आता वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलताई पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या अमरावती आणि छतरपूर येथील घरांची झडती घेतली असून अमरावती ते मोर्शी प्रवासादरम्यान टोल प्लाझा आणि नांदगावपेठच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरणही आता मागवण्यात आले आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी घडलेल्या या तिहेरी हत्या प्रकरणात प्रवीण मनवर याने छतरपूर येथे एचआयव्ही चाचणी केलीच नव्हती, अशी नवीन माहिती समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुलताई पोलिसांनी पुरावे गोळा करणे सुरू केले असले, तरी अजूनही तपासाला दिशा मिळालेली नाही. आरोपी प्रवीण मनवर याच्या शंकरनगर परिसरातील फ्लॅटची झडती घेतल्यानंतर मुलताई पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.के. सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने शनिवारी मध्यप्रदेशातील छतरपूर येथील अवस्थी पॅथॉलॉजी लॅबमधून माहिती गोळा केली. याच पॅथॉलॉजी लॅबमधून केलेल्या चाचणीतून प्रवीणने आपल्याला एचआयव्हीची लागण झाल्याचा दावा केला होता. पोलिसांनी लॅबचे संचालक महेश अवस्थी यांची चौकशी केली. त्यात प्रवीणने या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारची चाचणीच केली नव्हती, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी लॅबमधील संगणकाची तपासणी सुरू केली आहे. पोलिसांनी नंतर छतरपूर येथील ग्रीन एव्हेन्यू परिसरातील प्रवीणच्या घराचीही झडती घेतली. त्यातून पोलिसांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. छतरपूर जिल्ह्यातील एनटीपीसीच्या औष्णिक वीज प्रकल्पात स्थापत्य विभागाचा व्यवस्थापक असलेल्या प्रवीणवर गेल्या ३ मार्चला वरूड-मुलताई मार्गावरील सदाप्रसन्न घाटात कार दरीत ढकलून दिल्यानंतर कारला पेटवून पत्नी आणि दोन मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे.
आपल्याला एचआयव्हीची लागण झाल्यानंतर पत्नी आणि एका मुलीलाही संक्रमण झाल्याने सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नातून ही घटना घडल्याचा दावा प्रवीणने केला होता. गेल्या ९ मार्चला तो अमरावती पोलिसांना शरण आला होता. कारला पेटवून देण्यासाठी त्याने अमरावती ते मुलताई प्रवासादरम्यान नांदगावपेठ येथील पेट्रोल पंपावरून प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल भरून घेतले होते. मुलताई पोलिसांनी या पेट्रोल पंपासह मार्गावरील टोल प्लाझावरील सीसीटीव्ही चित्रीकरण मागवले आहे. यातून कारमध्ये किती लोक होते, हे स्पष्ट होईल.