घरांचे नुकसान, शेकडो गावे अंधारात

रायगड जिल्ह्यत शुक्रवारी ( दि. २८) सायंकाळी आलेल्या वादळामुळे करुडों रुपयांचे  नुकसान झाले. उत्तर रायगडातील अलिबाग, मुरुड, उरण , पेण, कर्जत  या तालुक्याना वादळाचा तडाखा जास्त बसला. पेण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. शेकडो घरांचे नुकसान झाले. वीजेचे खांबकोसळल्यामुळे शेकडोंनी गावे अंधारातहोती. काही ठिकाणे २४ तासांहून अधिककाळ वीजपुरवठा खंडित होता. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

शुक्रवारी  संध्याकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला. अनेक घरांचे पत्रे उडाले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडली  वीजेचे खांब कोसळल्याने  शेकडोने गावे अंधारात गेली.काही ठिकाणी आठ ते दहा तासानंतर वीजपुरवठा सुरू झाला. काहीगावे २४  तासांहून अधिककाळ गावे अंधारात होती. उरण, अलिबाग, मुरूड,कर्जत तालुक्यांना वादळाचा तडाखा बसला. साखरचौथ ( गौरा गणपती )गणेशोत्सवाची धूम सुरु असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसाने भाविकांची चांगलीच तारांबळ उडवून दिली.

गेल्या महिनाभरापासून पावसाने अलिबाग तालुक्यात पूर्ण पाठ फिरवली होती. शुक्रवारी सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान अलिबाग तालुक्यातील अनेक भागात वादळी वारे सुरु झाले. तसेच काही अवधीनंतर या वादळी वारयासह मुसळधार पावसाच्या सरी सुरु झाल्या. वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे सायंकाळी तालुक्यात भयानक आपत्तीची परिस्थिती निर्माण झाली. विद्युत खांब,वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत वादळी वारे आणि मुसळधार पाऊस,विजांचा कडकडाट सुरु होता. अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते.

अलिबाग शहरातील हॉटेल द्वारका समोरील, पोलीस अधीक्षक निवासस्थान परिसरातील व अन्य दोन उच्चदाब, तसेच तीन लघुदाब विद्युत खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. पोलीस लाईन,तळकरनगर, जोगळेकर नाका, कस्टम बंदर, कोळीवाडा, हिराकोट तलाव,श्रीबाग, चेंढरे, रेवदंडा नाका , आर . सी. एफ. वसाहत येथेही विद्युत  वाहिन्या तुटल्या  अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे आपले सहकारी व नगरपरिषद कर्मचार्यासह रात्रीच जेसीबी, कटर मशीन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या फांद्या व झाडे बाजूला करून वाहतुकीचे मार्ग मोकळे केले. शनिवारी दुपापर्यंत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पडलेले खांब आणि वाहिन्या दुरूस्त करण्यासाठी युध्दपातळीवर काम करीत होते.

अलिबाग तालुक्यातील अलिबाग-मांडवा रस्त्यावर अनेक झाडे कोसळली होती. अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने रात्रीच या ठिकाणी जावून झाडे रस्त्यातून काढली . किहीम,झिराड, मापगांव, बहिरोळे, नारंगी,फुफादेवीपाडा, काल्रेखिंड परिसर, सारळ,चौल, वेश्ऱ्वी, कुरढण, गोंधळपाडा , खंडाळे या भागातही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वरसोली येथील सुंदर असे सुरुचे बन कालच्या वादळी वारयामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शुक्रवारच्या वादळी वारयामुळे वरसोली किनाऱ्यावरील सुमारे ५०  ते ६०  सुरूची मोठी झाडे तुटुन पडली. या सुरूच्या बनामध्ये ग्रामपंचायतीमार्फत गार्डन, सिसिटीव्ही कमेरे, स्वच्छता गृह यांचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायती हद्दितील नारळाची झाडे,पोफळी यांची झाडेही तुटून पडल्याने घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वारयामुळे वरसोली गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन पर्यटन व्यवसाय सुरू होत असतानाच हे वादळी वारे झाले आहेत. त्याचा मोठा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे येथील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले आहेत. ग्रामपंचायत हद्दितील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी महसूल विभागाकडे केली असल्याची माहिती सरपंच मिलिंद कवळे यांनी दिली.

‘वादळाचा तडाखा उत्तर रायगडातील अलिबाग, मुरुड, उरण, पेण, कर्जत या तालुक्याना जास्त बसला. पेण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले.पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. ’    – सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी