परभणी : कर्जमाफी मिळताना त्रास झाला का, असे विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ही कर्जमाफी अधिक सुकरपणे व्हावी, यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधताना शेतकऱ्याला न दुखावता प्रामाणिकपणे योजनेची कामे करावीत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी परभणी जिल्ह्यातील पिंगळी व गिरगाव (ब्रु) येथील शेतकरी व जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.

परभणी तालुक्यातील पिंगळी येथील शेतकरी विठ्ठल रुस्तुमराव गरुड यांच्याकडील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असलेले एक लाख १५ हजार ८७५ रुपये कर्जमाफ झाले. हा लाभ सहजपणे मिळल्याची भावना  त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी बोलताना व्यक्त केली. आपल्या मुलींच्या लग्नाचे निमंत्रणही त्यांनी दिले. तसेच कर्जमाफी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ‘जमीन किती आहे ?’ असे प्रश्न विचारत आनंदात राहा, मुलाबाळांचे शिक्षण पार पाडा. सरकार आपल्या पाठीशी असेल असे आश्वासन दिले.

या गावातील बाबाराव शंकरराव दामोदर यांचे एक लाख आठ हजार २७३ रुपयांचे कर्जमाफ झाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कर्जमाफी देताना शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये अशी रचना केली जात असल्याचे पवार यांनी सांगितले.