राज्य परिवहन विभागाची एसटी सेवा सकाळी बंद राहिल्याने प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल झाले. मात्र या कालावधीत शहरी भागात रिक्षा व वडाप चालकांनी चांदी करून घेतली. संप मागे घेतल्याने दुपारी १२ नंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सांगली-मिरज शहरी बससेवाही दुपापर्यंत बंद होती.
केंद्र सरकारच्या रस्ता वाहतूक व सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आज परिवहन क्षेत्रातील कामगारांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. सांगली जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. त्यामुळे दुपारनंतर एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली.
मात्र सकाळी एसटी सेवा बंद राहिल्याने रिक्षा चालक आणि वडाप चालक यांची चांदी झाली. आज विवाह आणि वास्तुशांतीचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात असल्याने प्रवासासाठी खासगी वाहनांचा मोठय़ा प्रमाणात वापर करावा लागला. कर्नाटकातूनही आज प्रवासी वाहतुकीसाठी दुपापर्यंत बससेवा उपलब्ध नव्हती.