जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून सोलापूरला कांदा भरून निघालेली मालमोटार चालकाचा ताबा सुटल्याने तुळजापूरजवळील घाटशीळ घाटात उलटली. शनिवारी सकाळी घडलेल्या या अपघातात गाडीचा मालक व चालक हे दोघे जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथून अभिमन्यू नीळकंठ सावळे हे दोन मालमोटारींमध्ये कांदा भरून सोलापूरला निघाले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास तुळजापूरपासून हाकेच्या अंतरावर घाटशीळ मंदिराच्या पायथ्यास घाटाच्या पहिल्या वळणावर ही मालमोटार (एमएच १९ झेड ३८५८) चालक लोटल उत्तम सूर्यवंशी (वय ४२, पोहरे, तालुका चाळीसगाव) याचा ताबा सुटल्याने उलटली. समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. चालक सूर्यवंशीसह मालक अभिमन्यू साबळे (वय ४८, पोहरे, तालुका चाळीसगाव) हेही जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असलेले भया सोमसिंग कच्छवा व लालसिंग बापुसिंग कच्छवा (दोघे वरखेडा बुद्रुक, तालुका चाळीसगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविले. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, अपघाताच्या काही मिनिटे आधी इंधन भरण्यासाठी तुळजापूरजवळील पेट्रोलपंपावर ही मालमोटार थांबली होती. इंधन भरून पुढे निघाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत हा अपघात घडला. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुसऱ्या मालमोटारीतील चालक, क्लीनरने अपघातग्रस्त मालमोटारीतील जखमींना दवाखान्यात दाखल केले. पोलिसांनी मदतकार्य केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.