तेलंगणा राज्यातील नारायणखेड येथे सफरचंद फळविक्रीसाठी ऑटोरिक्षाने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिल्याने ऑटोचा चेंदामेंदा होऊन ऑटोतील ३ युवक ठार असून चालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी तेलंगणा राज्याच्या बान्सवाडा तालुक्यातील कंधारपल्ली चौरस्ता येथे घडली.

देगलूर येथील फळविक्रेते शेख सद्दाम शेख मौलाना व शेख बाबा शेख महेबुब हे शेजारच्या तेलंगणा राज्यातील नारायणखेड येथील आठवडी बाजारात सफरचंद फळविक्री करण्यासाठी ऑटोरिक्षा क्रमांक टीएस ११३० ने जात होते. त्यांच्यासोबत शेख फीरदोस हा बिचकुंदा येथे जाण्यासाठी ऑटोने जात होता. तेंव्हा तेलंगणा राज्याच्या बांसवाडा तालुक्यातील कंधारपल्ली चौरस्त्याच्या राज्य मार्गावर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर मालवाहू ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिल्याने ऑटोरिक्षा चेंदामेंदा झाला. यामध्ये देगलूर येथील लाईनगल्ली भागातील शेख सद्दाम शेख मौलाना (वय २२) व शेख बाबा शेख महेबुब (वय २४) आणि शेख फीरदोस राहणार फुले नगर, देगलूर (वय २३) हे तीघे ठार झाले. तर चालक हबीब चाऊस वली चाऊस राहणार तळगलल्ली, देगलूर (वय २५) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झाल्याची माहिती कंधारपल्ली परिसरातील लोकांना मिळाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती व अपघातांत सापडलेल्या युवकाची मदत केली.