भोकर- हिमायतनगर -किनवट महामार्गावरील सुधा प्रकल्पाच्या वळणावर भरधाव येत असलेऱ्या ट्रकने मोटार सायकलस्वार जोरदार धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार प्राध्यापक सतीश नामदेव जाधव ( ३५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस खात्यात असलेल्या त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. भोकर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक पसार झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. सतीश नामदेव जाधव ( ३५ ) हे दि. १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मोटारसायकल क्र. एम.एच. २६ ए. वाय.१३१ वरून त्यांच्या पत्नी ज्योती आणि मुलीसोबत नांदेड येथून गावाकडे जात असताना हा अपघात झाला. भोकर – किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाजवळ आले असताना भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्रं .एम. एच.२६ एडी२१४७ ने त्यांना उडविले. सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात सतिश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी व मुलगी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात प्राथमोपचार करुन अधिक उपचारार्थ त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नांदेड येयील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत. भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पाराव रूपसिंग राठोड (रा. धावरी तांडा) यांचे मयत प्राध्यापक हे जावई असून जखमी महीला त्यांची मुलगी आहे. दोन वर्षापूर्वीच मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं होतं, परंतू काळाने हा दुर्दैवी घाव घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck bike accident in nanded
First published on: 16-10-2018 at 18:53 IST