करोनाच्या संसर्गाबाबत सर्वत्र सुरू असलेल्या चर्चा, समाजमाध्यमांमधून पसरविली जाणारी अपुरी आणि चुकीची माहिती यामधून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात भर पडत आहे. तेव्हा अचूक माहिती कोठे मिळवावी आणि शंकांचे निरसन कसे करावे हे समजून घेऊ या..

माहितीचा योग्य स्रोत काय?

करोना संसर्गाबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी stopcoronavirus.mcgm.gov.in येथे सर्व अधिकृत माहिती नमूद केली आहे. तसेच १९१६ ही २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाइन देखील सुरू आहे. नागरिकांना अधिक माहितीसाठी १०४ टोल फ्री क्रमांक तसेच करोना राज्य नियंत्रण कक्ष ०२०-२६१२७३९४ क्रमांक उपलब्ध केलेला आहे. याखेरीज अन्य कोणत्याही स्रोतामधून मिळालेल्या माहितीवर थेट विश्वास ठेवू नका.

विलगीकरण आणि अलगीकरण (क्वारंटाईन) कक्ष म्हणजे काय?

अलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष म्हणजे जेथे संशयित रुग्णांना १४ दिवसांसाठी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले जाते. येथे मास्कपासून, जेवण, वायफाय, औषधांसह सर्व सुविधा रुग्णालयात पुरविल्या जातात. यांना या दिवसात करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण (आयसोलेशन) कक्षामध्ये ठेवले जाते. संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना वॉर्डमध्ये ठेवले जाते. करोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांपासून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. देशात परतल्यापासून १४ दिवसांनंतर कोणतीही लक्षणे न आढळल्यास आणि चाचणी नकारात्म्क आल्यास या रुग्णांना घरी सोडले जाते.

विलगीकरण कक्ष म्हणजे जेथे करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असते अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून सर्वच कर्मचारी कक्षामध्ये जाताना विशेष काळजी घेतात. अलगीकरण आणि विलगीकरण हे पूर्णपणे वेगवेगळे वॉर्ड असतात. यातील रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जाते.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले असून ५०२ खाटा उपलब्ध केल्या आहेत. बाधित देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. हा विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असली तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.

‘करोना’चा संसर्ग कसा होतो?

रुग्णाच्या खोकल्यातून उडालेले तुषार करोनाच्या विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यास ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर हे हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास तर ते श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो.

रुग्ण खोकल्यावर हवेत उडालेल्या तुषारामध्ये करोनाचे विषाणू असतात. ही विषाणूयुक्त हवा श्वसनावाटे घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते प्रवेश करू शकतात.

कशी होते करोनाची चाचणी?

ही चाचणी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या कापसाच्या बोळ्यांचा (स्व्ॉब) वापर केला जातो. हा बोळा घशाच्या मागच्या भागातून आणि नाकपुडीतून फिरवला जातो. या ठिकाणी अधिक प्रमाणात विषाणू असण्याचा संभव असतो. हा बोळा नंतर तपासणीसाठी पाठविला जातो.

चाचणीची गरज कोणाला?

सध्या मुंबई, पुणे आणि नागपूर येथे करोनाची चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. बाधित देशातून आलेल्या आणि करोनाची लक्षणे आढळलेल्या प्रवाशांनी तातडीने जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधून चाचणी करणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाधित देशातून प्रवास न केलेल्या आणि करोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न आलेल्या व्यक्तींनी सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास करोनाची बाधा झाली असेल या भीतीने चाचणी करण्यासाठी जाऊ नये.

सर्वाधिक धोका कुणाला?

ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला, मूत्रपिंडाचे विकार, कर्करुग्ण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा रुग्णांमध्ये संसर्गाचे स्वरूप गंभीर होण्याचा संभव असतो.

काय काळजी घ्याल?

खोकला, किंवा शिंक आल्यास रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. हे जवळ उपलब्ध नसल्यास कोपर तोंडासमोर धरून शिंका.

सर्दी, खोकला किंवा ताप याचा संसर्ग झाल्यास मास्कचा वापर करावा, जेणेकरून संसर्ग तुमच्या जवळच्या व्यक्तीला होणार नाही. शक्यतो घरातच आराम करा.

संसर्ग टाळण्यासाठी वरचेवर हात स्वच्छ धुवा. सॅनिटायजर उपलब्ध नसल्यास साबणाने स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे आहे.

सर्दी, खोकल्याचा संसर्ग झालेल्या रुग्णापासून एक हात दूर राहा.

समाजमाध्यमांवरील संदेशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आरोग्य विभागाकडून अधिकृतपणे जाहीर केलेली माहिती जाणून तिचा प्रसार करा.

काय करणे टाळाल?

  •  प्रतिबंधात्मक म्हणून प्रतिजैविकांचे सेवन करू नये. तसेच लसूण किंवा अन्य कोणताही पदार्थ किंवा औषधे खाल्लय़ाने करोनाचा संसर्ग रोखणे शक्य नाही. यासाठी प्रतिबंधात्मक औषधे सध्या तरी उपलब्ध नाहीत.
  •   संसर्ग रोखण्यासाठी म्हणून वरचेवर हात धुणे आवश्यक असले तरी याचा अतिरेक करू नये. तसेच अल्कोहोल किंवा क्लोराईनचा स्प्रे अंगावर मारू नये. यांचा वापर जमीन स्वच्छ करण्यासाठी केला जातो.
  •  कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाऊ नये
  •  भाज्या-फळे धुतल्याशिवाय खाऊ नयेत.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नका. हे हात चेहऱ्याला किंवा अन्य ठिकाणी लावल्यास संसर्ग पसरण्याचा धोका असतो
  • हात स्वच्छ धुतल्याशिवाय चेहरा, नाक, तोंड याला स्पर्श करणे टाळावे.
  •   सर्दी, खोकला अन्य संसर्ग न झाल्यास मास्कचा वापर करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांच्याद्वारे पसरू नये, म्हणून संसर्गबाधितांनी मास्क वापरण्याची आवश्यकता आहे.