संतती प्राप्तीबाबत स्त्री-पुरुष भेद निर्माण करणारे वक्तव्य केल्याने टीकेची झोड उठल्यानंतर निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांनी अखेर आपल्या वक्तव्याबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त केली. मात्र इंदुरीकर महाराजांनी माफी  मागितलेली नाही, असे सांगत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास इंदुरीकर महाराजांना काळे फासण्याचा, तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला.

…म्हणून अहमदनगरला गेल्या

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाईंनी मंगळवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळेस त्यांनी इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही अकोले येथे इंदुरीकरांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. “इंदुरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोललेत त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार कारवाई व्हावी,” अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली आहे.

तर मंत्र्यांना कोंडून घेऊ…

राजकारणी इंदुरीकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे. “मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री तसेच काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजकारण्यांनी हे बंद करावे. तसं न केल्यास त्यांना मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू,” असं त्या म्हणाल्या. “आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडवणार म्हणणारे पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत,” अशी टिकाही देसाई यांनी केली.

आणखी वाचा – ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदुरीकर महाराजांना सिंधुताईंचा सल्ला, म्हणाल्या…

ते कार्यकर्ते ताब्यात

तृप्ती देसाई यांना विरोध करण्यासाठी निघालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यां स्मिता अष्टेकर यांना पोलिसांनी पुणे रस्त्यावर ताब्यात घेतले, तसेच तृप्ती देसाई यांच्याविरोधात काही तरुणांनी बाह्य़वळण रस्त्यावर काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला.

इंदुरीकर महाराजांची माफी…

इंदुरीकर महाराजांवर ‘पीसीएनडीटी’ कायद्यान्वये कारवाईची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली असून महाराज समर्थक व विरोधक यांच्यात समाजमाध्यमावर द्वंद्व सुरू आहे. हा वाद सुरु असतानाच मंगळवारी इंदुरीकर महाराजांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या २६ वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन, अंधश्रद्धा  निर्मूलन व विविध जाचक अटी, रुढी परंपरा निर्मूलनावर भर दिला होता. माझ्या वाक्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.