कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापूरमध्ये जमावबंदीचे आदेश असताना त्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना शिरोली नाक्यावरच ताब्यात घेण्यात आले. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते.
तृप्ती देसाई यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याला हिंदूत्त्ववादी विचारांच्या संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. या संघटनांचे अनेक कार्यकर्ते बुधवारी सकाळपासूनच मंदिराच्या परिसरात जमले आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याला सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सात महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात गर्भगृहात प्रवेश करून देवीची ओटीही भरली होती. पण हिंदूत्त्ववादी विचारसरणीच्या संघटनांनी तृप्ती देसाई यांना कोल्हापुरात येण्याला आणि मंदिरच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याला विरोध केला.
शनिशिंगणापूर येथील आंदोलनाला यश आल्याने तृप्ती देसाई यांनी आता ‘चलो कोल्हापूर’चा नारा दिला होता. न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाचा हक्क दिल्याने कोणत्याही परिस्थितीत गाभाऱ्यात जाणारच, असा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला होता. त्याचबरोबर त्या संदर्भातले पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.