शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई या सकाळीच पुण्याहून शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली.

देसाई म्हणाल्या,”साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवलं असून याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत.”

तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आणखी वाचा- “तृप्ती देसाई शिर्डीत येऊ दे, त्यांचे सगळे स्टंट बंद करतो”

“शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारू”, असा इशारा तृप्ती देसाई यांनी पुण्याहून निघण्यापूर्वी दिला होता. तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले आहेत. सीमेवरच त्यांना रोखू असा इशारा त्यांनी दिला होता.

काय आहे ड्रेसकोड फलक प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.