भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या निर्णयाचं स्वागत केलं असून हा राज्यघटनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच लवकरच आपण सबरीमाला मंदिरात प्रवेश करु असं त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र त्यांनी यावेळी तारीख सांगितलेली नाही.

‘हा राज्यघटनेचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महिलांना समानतेचा अधिकार दिला आहे. लवकरच आम्ही सबरीमाला मंदिरात प्रवेश करु. त्याची तारीख लवकरच जाहीर करु. अनेक मंदिरात महिलांना दुय्यम स्थान दिलं जात असून विचारसरणी बदलण्याची गरज आहे’, असं तृप्ती देसाई बोलल्या आहेत.

Sabarimala Temple Verdict: महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य: सुप्रीम कोर्ट

‘अनेकांनी आम्हाला हिंमत असेल तर सबरीमाला मंदिरात प्रवेश करुन दाखवा असं आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या देशात लोकशाही आहे हे सिद्ध केलं आहे. जी दादागिरी तसंच महिलांविरोधातील षडयंत्र आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने थांबवलं आहे. मासिक पाळी अपवित्र नसल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे’, असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.

केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निकाल दिला. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. सबरीमला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशबंदी होती. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना प्रवेश दिला जातो. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सुप्रीम कोर्टात २००६ मध्ये याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं.