मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आत्महत्या झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावातील तृष्णा तानाजी माने या १९ वर्षीय विद्यार्थिनीने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. तृष्णा बी कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत होती. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये तृष्णा सहभागी असायची. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ती कमालीची अस्वस्थ्य होती. यातूनच बुधवारी तिने राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हाभर संतापची लाट उसळली होती. मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत तृष्णावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. यानंतर गावात व जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर आज दुपारी २ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.