शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण या दोघांकडे निवडणुकीसाठी मुद्देच नाहीत. विकास व भ्रष्टाचार यावर ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून मोदींना लक्ष्य करून निवडणुकीला जातीयवादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बीड लोकसभेचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेच्या पाश्र्वभूमीवर फडणवीस यांची पत्रकार बठक झाली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भात १० जागांवरील निवडणुकीत महायुतीचा विजय होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला खातेही उघडता येणार नाही. दुसऱ्या टप्प्यात प्रचार अंतिम स्थानावर आला आहे. मराठवाडय़ात महायुतीला प्रचंड पािठबा मिळत असून येथेही परिवर्तनाची लाट असल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाडय़ाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रात हीच स्थिती आहे, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची विकेट पडणार असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तवले. निवडणुकीत आपल्याला यश येणार नाही हे सत्य शरद पवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच देशात सर्वाधिक जागा एनडीएला मिळतील, असे पवारांकडून सांगण्यात येत आहे. एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील. परंतु मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे वक्तव्य करून पवार अर्धे सत्य बोलत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर पवारही पूर्ण सत्य बोलतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला.