कळंब (जि. उस्मानाबाद) येथील न्यायालयाच्या आवारातच न्यायाधीशांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आकाश चोंदे याला अटक केली असून तो शिवसेनेच्या नगरसेविका मीरा चोंदे यांचा मुलगा आहे. कळंब पोलीस पुढील तपास करत आहेत.

अधिक माहिती अशी, कळंब येथील दिवाणी न्यायाधीश अनंत मुंडे हे उन्हाळ्याची सुटी संपवून रविवारी (दि.२०) रात्री ८ वाजता एमएच ४४ बी १४०१ या कारमधून कळंब न्यायालय परिसरात आले होते. न्यायालयाच्या परिसरातच न्यायाधीशांची निवासस्थाने असल्याने ते निवासस्थानांकडे जात असताना तेथील पहारेकरी घुगे हे तेथे थांबले होते. याचवेळी अचानक एक इंडिका कार वेगात न्यायालयाच्या आवारात दाखल झाली. पहारेकरी घुगे यांनी कारचालकाला ‘तुम्हाला काय पाहिजे’ असे विचारले. चालक आकाश चोंदे पहारेकऱ्याशी मोठ्याने बोलत असल्याने न्यायाधीश मुंडे यांनी विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या चोंदेने त्याची कार थेट मुंडे यांच्या अंगावर घातली. मुंडे हे बाजूला सरकल्याने ते थोडक्यात बचावले. नंतर कार तेथून वेगात निघून गेली.

मुंडे यांच्या फिर्यादीवरून चोंदे विरोधात कळंब पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्याला अटक केली असून त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंडे यांना जीवे मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते.