चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे येत्या पाच वर्षांत दुप्पट दरडोई उत्पन्न वाढावे म्हणून सरकारने विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात विकास, पर्यटनसाठी समान निधीवाटप करण्यात येत आहे. टीका करणाऱ्या विरोधकांच्या मतदारसंघाच्या विकासालाही समान निधीवाटप केल्याचा टोला दीपक केसरकर यांनी हाणला.
सावंतवाडी नगरपालिका पर्यटनमहोत्सव शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना जिल्ह्य़ाच्या विकासासाठी एक हजार कोटी प्रस्तावित आहेत, असे स्पष्ट केले. मुंबई महापालिका बेस्ट समिती अध्यक्ष अरुण दुधवडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, संपर्कप्रमुख राजू नाईक, सभापती स्वाती कुडतरकर, अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत, विलास जाधव, संजय पेडणेकर, पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे व नगरसेवक उपस्थित होते.
मी अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला शिवसेनेत प्रवेश दिला आणि मंत्रीही केले. त्यांनी राज्यात काम करण्याची संधी दिली. ही संधी तुमच्या आशीर्वादातूनच मिळाली आहे, असे राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले. महाराष्ट्र एकसंध आहे असेच कोकणातील माणसे समजत आली आहेत. मी निरपेक्ष भावनेने काम करीत आहे, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी ६५० कोटी रुपये आणले आहेत. त्याचा तपशील जिल्हाधिकारी यांनी एक माहितिपुस्तिका प्रसिद्ध करून दिला आहे. आता त्यात आणखी ३५० कोटींची तिलारी प्रकल्पामुळे भर पडली आहे. तिलारी सिंचनासाठी मिळणारे पैसे जमा करून एक हजार कोटींचा निधी आणला असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगून टीकाकारांनी हा तपशील पाहावा, असे आवाहन केले.
केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री विकास निधीसाठी भरभरून देत आहेत. त्यात कोणतीही अडचण नाही. सावंतवाडीत परस्परांवर प्रेम करून शांततेचा प्रचार करणारी मंडळी आहेत, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्पर्धा अभ्यासक्रमाचे केंद्र सावंतवाडीत होत आहे, असे त्यांनी सांगून टीका करणाऱ्यांच्या मतदारसंघातही पर्यटन निधी वाटप केला आहे. लोकसंख्या व रस्त्यांच्या लांबीनुसार रस्ते विकास कार्यक्रम हाती घेतल्याचे केसरकर म्हणाले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरात स्वच्छता, सुरक्षितता, शिक्षण याकडे लक्ष देत असल्याचे सांगितले.