येथील जुन्या बसस्थानकावर एक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या महाराष्ट्र बँक शाखेच्या इमारतीच्या खिडकीचे गज गॅस कटरने तोडून बँकेत प्रवेश करणाऱ्या चोरटय़ांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरल्याने १० लाखांची अनामत वाचली.
कळमनुरीत जुन्या बसस्थानकावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत बुधवारी रात्री हा प्रकार घडला. चोरटय़ांनी इमारतीच्या खिडकीचे गज गॅसकटरने तोडून आत प्रवेश केला. बँकेतील दोन तिजोऱ्या फोडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे चोरटय़ांनी सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म यंत्रणा निकामी केली होती.
गुरुवारी सकाळी बँकेच्या वेळेत कर्मचारी आले असता हा प्रकार लक्षात आला. बँक कर्मचारी गजानन जाधव यांनी याबाबत कळमनुरी पोलिसात फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी निरीक्षक रविकांत सोनुने व कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. निरीक्षक डी. जी. कंठाळे यांच्या पथकाने चोरटय़ांच्या बोटांचे ठसे घेतले, तर श्वानपथकाने बँकेच्या मागे असलेल्या शेतातून मुख्य रस्त्यापर्यंत चोरटय़ांचा माग काढला, मात्र श्वानपथकाला चोरटय़ांचा शोध घेण्यात अपयश आले.
चोरटय़ांनी गॅसकटरने दोनपकी एक तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरला. बँकेतील तिजोरीत १० लाखांपेक्षा अधिक रक्कम होती. तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने चोरटय़ांनी डीव्हीआर यंत्रणा सोबत घेऊन पळ काढला. चोरटय़ांच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना केली असल्याची माहिती लांजेवार यांनी दिली.