विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. भगवानगडावर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. गडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री यांनी या वेळी तणावाची स्थिती लक्षात घेऊन लोकांना शांततेचे आवाहन करीत मुंडे यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या घटनेचे वृत्त कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर बंद करून निषेध केला. धनंजय मुंडे यांनीही आपल्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात गडावरून करताच बीडचे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार धनंजय मुंडे सकाळी अकराच्या सुमारास श्रीक्षेत्र भगवानगडावर दर्शनास पोहोचले. मठाधिपती नामदेवशास्त्री यांची भेट व संत भगवानबाबांच्या गादीचे दर्शन घेतले. याच वेळी गडावर सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित काही लोकांनी मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी व दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. बीडच्या हद्दीवरील श्रीक्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबा समाधी सुवर्णमहोत्सव सुरू असून उद्या (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदावर निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही आपल्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात भगवानगडाचे दर्शन घेऊन करण्याचे ठरविले होते.
नियोजित कार्यक्रमानुसार मुंडे परळीहून भगवानगडावर पोहोचले. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नगरचे नेते प्रताप ढाकणे व मोठय़ा संख्येने गाडय़ांचा ताफा होता. पोलिसांनी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ इतर गाडय़ांचा ताफा रोखून धरत धनंजय यांची गाडी जाऊ दिली. गडावर पोहोचताच मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री यांची भेट व दर्शन घेतले. या वेळी सभामंडपातील लोकांनी मुंडे यांच्या दिशेने येत जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने नामदेवशास्त्री यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करीत धनंजय मुंडे यांना गडावरून सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या गाडय़ांचा ताफा निघाला तेव्हा काही लोकांनी त्यांच्या गाडय़ांच्या दिशेने दगडफेक केली. मात्र, यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या मुंडे समर्थकांनी परळी शहरात फेरी काढून ‘बंद’चे आवाहन केले. दुपारी दोननंतर परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तनात केला. भगवानगडाचे भक्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा चाहता वर्ग मोठा असून राजकीयदृष्टय़ा मुंडेविरोधक कोणालाच यापूर्वी गडावर स्थान मिळाले नाही. दिवंगत मुंडे उपमुख्यमंत्री असताना काँग्रेसचे तत्कालीन आमदार बबनराव ढाकणे यांनाही १९९८ ला दसरा मेळाव्यातच धक्काबुक्की करण्यात आली होती. मुंडे यांच्या निधनानंतर मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना गडाची कन्या म्हणून जाहीर केल्यानंतर पंकजा यांनीही गडावरूनच आपल्या राजकीय पर्वाला सुरुवात केली. त्यामुळे राजकीय विरोधक असलेल्या धनंजय मुंडे यांनी गडावर जाताच त्यांनाही विरोधाचा सामना करावा लागला. या घटनेने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे हा राजकीय संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गडावरील राजकारण दुर्दैवी – धनंजय मुंडे
श्रीक्षेत्र भगवानगडावर माझी श्रद्धा असून वैयक्तिक व राजकीय जीवनात यश मिळाल्यानंतर मी संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यासाठी मला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात येऊन गडाचे दर्शन घेण्याचे ठरवले होते. हा माझ्या श्रद्धेचा विषय असल्याने मला राजकारण करायचे नाही. पण मला आत बसवून काहींनी प्रक्षोभक भाषण करून चिथावणी दिल्याने जमाव बिथरला व दगडफेकीचा प्रकार घडला. हा पूर्वनियोजित कट होता. त्यामुळे प्रक्षोभक भाषणांची आणि पोलिसांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. गृहराज्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात धार्मिक स्थळी दगडफेक होत असेल तर हे कशाचे द्योतक आहे. दगडफेकीने माझी श्रद्धा पुसली जाणार नाही. ती कायम राहील. नगरच्या पोलिसांनी दौऱ्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.