मोहरलेली आंब्याची बाग स्टेट बँक ऑफ हैदराबादचे अडीच लाख रुपयांचे कर्ज फेडण्यास सज्ज झाली होती. अचानक काळाने घाला घातला. होत्याचे नव्हते झाले. याच नराश्यातून कळंब तालुक्यातील देवळाली येथील तरुण शेतकरी राजाभाऊ हरिश्चंद्र लोमटे यांनी जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो ९० टक्के भाजला. लातूर शासकीय रुग्णालयात त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.
लोमटे यांनी लहान भावाच्या मदतीने शेतात दोन एकर आंब्याची बाग उभारली. यंदा बागेला चांगले फळ आले होते. त्याशिवाय शिवारात ज्वारी, हरभरा व सूर्यफुलही तरारून डोलत होते. मात्र, सलग झालेली गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंब्याची बाग नेस्तनाबूत झाली. ताठ मानेने शिवारात उभे असलेले ज्वारी, हरभरा, सूर्यफुल पीकही मातीत मिसळले. स्टेट बँक ऑफ हैदराबादचे अडीच लाख रुपये कर्ज डोक्यावर असलेल्या लोमटे यांना मोठा धक्का बसला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते घरातून प्रातर्विधीस बाहेर पडले. हातात रॉकेलची बाटली घेऊन राजाभाऊ लोमटे यांनी शिवार गाठले आणि तडक अंगावर रॉकेल ओतून घेत जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. यात ते ९० टक्के भाजले.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. लोमटे यांना लातूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर भाजलेल्या लोमटे यांची सध्या आयुष्याशी लढाई सुरू आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे उत्पन्नाचा मार्गच बंद झाल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे आमदार राजेिनबाळकर यांनी सांगितले. आपल्या शेताच्या शिवाराला लागूनच त्यांची शेती आहे. त्यामुळे लोमटे परिवाराशी आपला परिचय आहे. वृद्ध आई-वडील, लहान भाऊ यांच्या मदतीने लोमटे यांनी मागच्या दोन वर्षांत शेतात भरपूर कष्ट घेतले. २४ तास शेतात राबणारा हा तरूण केवळ अवकाळीच्या तडाख्यामुळे कोसळला असल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत शिराढोण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.