कुंभमेळा ही केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी असल्याचे आजपर्यंत सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी आता सिंहस्थानिमित्त शहरात कोटय़वधी रुपयांच्या झालेल्या सर्व कामांचे श्रेय मनसेकडे घेत उपरोक्त सरकारांकडून अपेक्षित निधी प्राप्त झाला नसल्याची तक्रार केली. ज्या शहरांची सत्ता सलग २० ते २५ वर्षे एकाच राजकीय पक्षाकडे आहे, त्या शहरांची अवस्था पहा आणि नाशिकमध्ये अवघ्या साडे तीन वर्षांत मनसेने केलेला विकास पहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने १०५२ कोटींचा आराखडा तयार केला होता. स्थानिक संस्था कर व इतर आर्थिक कारणांमुळे ही कामे करण्यास पालिका असमर्थ असून कुंभमेळा केंद्र व राज्य शासनाची जबाबदारी असल्याचे दीड वर्षांपासून खुद्द राज यांचे म्हणणे होते. शासनाची रसद प्राप्त झाल्यामुळे रस्ते, पूल, साधुग्रामची उभारणी, आदी कामे मार्गी लावणे शक्य झाल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात. परंतु, राज यांना ही बाब बहुदा मान्य नव्हती. मनसेने झपाटय़ाने कामे करून नाशिकचा कायापालट घडवला आहे,असा दावा त्यांनी केला