राष्ट्रीय वारसा गटात समाविष्ट असणाऱ्या ऐतिहासिक त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीची झीज कुंभमेळा काळात कशी रोखावी, याची चिंता त्र्यंबकेश्वर देवस्थानला सतावत आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या या शिव मंदिरातील पिंडीची दूध, दही, मध, हळदी-कुंकू, तूप आदींमुळे कमालीची झीज होत आहे. पुढील पिढय़ांसाठी हा धार्मिक ठेवा जतन केला जावा, याकरीता भाविकांनी गाभाऱ्यात प्रवेश करणे टाळावे, असा देवस्थानचा प्रयत्न आहे. भारतीय पुरातत्त्व विभागानेदेखील या धोक्याची जाणीव करून दिली आहे.
कुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी साधू-महंतांसह देश-विदेशातील भाविकांची गर्दी वाढत आहे. शनिवार व रविवारी भाविकांचा आकडा १५ ते २० हजारापर्यंत जातो. प्रत्येक शाही पर्वणीला त्र्यंबकमध्ये ३० लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यावेळी या मंदिरातही दर्शनासाठी प्रचंड गर्दी होईल. सद्यस्थितीत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येत नाही. परंतु, पूजेसाठी येणारे भाविक पुरोहितांसमवेत गाभाऱ्यात प्रवेश करतात. त्र्यंबक नगरीतील ग्रामस्थांना दिवसभर पूजा-विधी करण्याची मुभा आहे. यावेळी संबंधितांकडून वाहण्यात येणारे पंचामृत, तांदूळ आदी घटकांमुळे पिंडीची  कमालीची झीज होत असल्याकडे माध्यान्ह पूजक तथा देवस्थानचे विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी लक्ष वेधले. मंदिरात त्रिकाल पूजा केली जाते. पूजेसमयी पिंड स्वच्छ करताना दररोज मातीचे कण समोर येतात. ही चिंताजनक बाब असून दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये, तसेच कोणतीही वस्तू वाहण्यास व पिंडीला हात लावण्यास प्रतिबंध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या शिव मंदिरातील पिंडीच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. या विभागाने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिगावर वाहिल्या जाणाऱ्या घटकांमुळे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे.  पिंडीच्या संरक्षणासाठी देवस्थानने पूजाविधीस आलेल्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेशाच्या वेळ सकाळी एक तास निश्चित केली आहे. परंतु, इतर वेळी प्रांगणात पूजाविधी झाल्यानंतर पुरोहित पूजेतील हे घटक वाहतात. परिणामी, दिवसभर झीज होण्याचा धोका कायम असल्याची बाब देवस्थानने मांडली. नऊ वर्षांपूर्वी पिंडीला वज्रलेप लावण्यात आला होता. वर्ष-दोन वर्षांतून अभ्यासाद्वारे झिजेच्या प्रमाणाचे अवलोकन केले जात आहे. सिंहस्थात पिंडीची झीज रोखण्यासाठी त्रिकाल पूजेव्यतिरिक्त गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश न देण्याचा विचार देवस्थान करीत आहे.