पूर्ववैमनस्यातून गर्भवती महिलेसह तिच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री भिंगारजवळील आलमगीर भागात घडला. महिला अत्यवस्थ आहे. पोलिसांनी १५ ते १८ जणांच्या जमावाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तिघांची ओळख पटली आहे. या गुन्ह्य़ासंदर्भात वेगवेगळी माहिती पुढे येत असल्याने पोलीस माहितीची खातरजमा करत आहेत.

रुकसार अजहर शेख (३०) व तिचा पती अजहर मंजुर शेख या दोघांना  सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुकसार हिच्या जबाबनुसार भिंगारच्या कँप पोलिसांनी आजम खान, सादिक शेख, जुबेद सय्यद या तिघांसह इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुकसार पाच महिन्यांची गर्भवती आहे. घटनास्थळी काल रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, सहायक अधीक्षक अक्षय शिंदे यांनी भेट दिली. मंगळवारी रात्री मात्र आलमगीरमध्ये स्फोट होऊन दोन जखमी झाल्याची चर्चा होती. मात्र, बुधवारी पोलिसांनी महिलेच्या जबाबानुसार खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने व उपनिरीक्षक करेवाड करत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी अजहर याचे तीन विवाह झाले आहेत. तो दोन पत्नींसह आलमगीरमधील साईनगर वसाहतीत राहतो. दोघींची नावे रुकसार आहेत.

व्यवसायाने तो इस्टेट एजंट आहे. त्याचे ऑफिस कोठला भागातील एसटी कॉलनीजवळ आहे. त्याने घरी व कार्यालयात यंदा गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. त्यावरून त्याचे समाजातील काही जणांशी वाद झाले होते. अजहर याच्याविरुद्धही तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात काही गुन्हे दाखल आहेत.