हिवाळी अधिवेशन आटोपताच आता काँग्रेसच्या वर्तुळात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून हे पद आपल्याच गटाला मिळावे, यासाठी पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर माणिकराव ठाकरे यांनी लगेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून या पदावर कोण, अशी चर्चा सुरू झाली. मात्र झारखंड व काश्मीरच्या निवडणुकांनंतर आता पक्षपातळीवरील हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राधाकृष्ण विखे पाटलांना मिळाले. विखेपाटील हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. विधानसभेतील काँग्रेसचे उपनेतेपदही चव्हाण समर्थक विजय वडेट्टीवारांकडे आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपद आपल्या गटाला मिळावे, यासाठी पृथ्वीराज चव्हाण गटाने श्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे. या गटाकडून या पदासाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव समोर करण्यात आले आहे. या नावाला अशोक चव्हाण गटाकडून विरोध आहे. हर्षवर्धन पाटील हे विधानसभेत पराभूत झालेले आहेत. शिवाय, १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता असताना ते सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे ते युतीच्या विरोधात प्रभावी कामगिरी बजावू शकणार नाही, असा युक्तिवाद केला जात आहे.
राज्यात पदांचे वाटप करताना सर्व गटांना समान न्याय देण्यात यावा, असा युक्तिवाद या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण गटाकडून केला जात आहे. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व माणिकराव ठाकरे यांनी माजीमंत्री नितीन राऊत यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. राज्यात भगवी युती सत्तेत आल्याने दलित समाजाला प्रतिनिधित्व दिले तर त्याचा फायदा मिळेल, असा युक्तिवाद त्यासाठी समोर केला जात आहे. काँग्रेसमध्ये सक्रीय असलेल्या राहुल गांधी यांच्या गोटात खासदार राजीव सातव व आमदार यशोमती ठाकूर या दोन नावांची चर्चा आहे. सातव यांच्या नावाला दोन्ही चव्हाण गटाकडून विरोध झाला तर यशोमती ठाकूर यांचे नाव ब्रिगेडकडून समोर केले जाईल, असे आज पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले.
‘एएमआयएम’चा प्रभाव लक्षात घेऊन विधान परिषदेचे आमदार मुज्जफर हुसेन यांचेही नाव काही नेत्यांनी समोर केले आहे. अशोक चव्हाण स्वत: या पदासाठी इच्छुक असले तरी त्यांचे नाव मागे पडले तर त्यांचा गट हुसेन यांच्या नावाला पाठिंबा देण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.