विधान परिषदेच्या जागेसाठी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या अनेक शिष्टमंडळांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षाकडून नावे जाहीर होण्याच्या अखेरच्या टप्प्यात समोर येत असलेल्या काही नावांबद्दल पक्षातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातून नाराजीही उमटू लागली आहे.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, ही नावे एकदोन दिवसांत पक्षाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. या नियुक्तीसाठी पक्षात जिल्ह्य़ातील अनेक जण इच्छुक आहेत. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रदेश सरचिणीस शिवाजीराव गर्जे, बिपीन कोल्हे, अलीकडेच पक्षात प्रवेश केलेले प्रताप ढाकणे, माजी आमदार दादा कळमकर, माजी खासदार प्रसाद तनपुरे या नियुक्तीसाठी इच्छुक आहेत. त्यांची शिष्टमंडळे त्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटली आहेत. सध्याही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
यातील शिवाजीराव गर्जे व ढाकणे यांचे नाव जिल्ह्य़ातून शर्यतीत आल्याने पक्षातील पदाधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. ढाकणे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आले. पक्षासाठी कोणतेही काम न करता थेट विधान परिषदेच्या सदस्यत्वसाठी ते आग्रही झाल्याने काही जण नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र ढाकणे समर्थक प्रवेशाच्या वेळीच पवार यांनी या जागेसाठी शब्द दिल्याचा दावा करत आहेत, तर हा शब्द केवळ केदारेश्वरच्या मदतीचा होता, असा पक्षातील काहींचा दावा आहे.
गर्जेही तीन वर्षांपूर्वी मनसेतून राष्ट्रवादीत आले. त्यापूर्वी ते राष्ट्रवादीतच होते. मात्र पवार यांच्यावर टीका करत त्यांनी मनसेत प्रवेश केला व विधानसभेची निवडणूक लढवली, पराभूत झाल्यावर पुन्हा मनसेवर टीका करत राष्ट्रवादीत प्रवेश केला व थेट प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती पटकावली. आताही ते पुन्हा इच्छुक असल्याने व त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने नाराजी उमटू लागली आहे. विरोधासाठी काही शिष्टमंडळेही उद्या पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. या धुमसणा-या असंतोषावर पक्षात काय निर्णय घेतला जातो, याकडे पदाधिका-यांचे लक्ष आहे.