News Flash

सिंधुदुर्गात नाटय़कलावंतांच्या अवमानाने संताप

सिंधुदुर्गनगरीत मंगळवारी ३१ जानेवारी रोजी कलाकार विश्रामगृहावर थांबले.

‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाच्या कलाकारांचा सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील विश्रामगृहातील सुटमधील कपडे, साहित्य बाहेर काढल्याने झालेल्या अवमानावर प्रशासनाने सौजन्याची चिरफाड केल्याचे सुज्ञ जाणकारांचे मत आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्य़ात अतिथी भवो म्हणून स्वागत करायचे सोडून कलाकार कसे चुकले हे दाखविण्याचा प्रकार जिल्हा प्रशासन करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग ओरोस या नगरीत ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकाचा प्रयोगासाठी अखिल भारतीय ९७व्या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, माजी संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, अभिनेता गिरीश ओक, रवी पटवर्धन सहमहिला कलाकार आले होते. त्यांची राहण्याची सोय ओरोस येथील शासकीय विश्रामगृहावर करण्यात आली होती.

सिंधुदुर्गनगरीत मंगळवारी ३१ जानेवारी रोजी कलाकार विश्रामगृहावर थांबले. या विश्रामगृहावरील दोन कक्ष महिला व दोन कक्ष पुरुष कलाकारांसाठी आयोजकांनी आरक्षित केल्याचे सांगितले. त्यामुळे कलाकारांनी मुक्काम करून रात्री प्रयोगासाठी गेले.

ओरोस येथे कलाकारांचा प्रयोग सुरू असतानाच विश्रामगृहातील कक्षात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांचे नातेनाईक पोहचले. यावेळी विश्रामगृहातील कर्मचाऱ्याने नाटक सुरू असणाऱ्या ठिकाणी जाऊन कक्षाची चावीची मागणी केली. महिलांचे कक्षाना चावी नव्हती. त्या कक्षातील महिलांचे साहित्य कक्षाबाहेर काढले.

सिंधुदुर्गनगरीमधील शासकीय विश्रामगृहात कर्मचारी कमी आहेत, हे विश्रामगृह एका बाजूला निवांत शांततेच्या जागी असल्याने अनेकजण पसंती देतात. सध्या निवडणूका आचारसंहिता असल्याने राजकीय नेते आरक्षण करत नाहीत, पण पाटर्य़ासाठी या विश्रामगृहाला पसंती आहे.

जिल्ह्य़ातील व्हीआयपी कक्षाचे बुकिंग जिल्हाधिकारी कार्यालयातूनच दिले जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहांचे व्हीआयपी सुटचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने करण्याचा सिंधुदुर्गात एक अलिखित नियम आहे. पण सध्या आचारसंहिता असल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व्हीआयपी ठरले.

या कलाकारांना चार कक्ष दिले, पण आणखीही तेथे कक्ष उपलब्ध असताना कलाकारांच्या कक्षावर व्हीआयपीनी लक्ष केले. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे. त्याशिवाय ज्येष्ठ कलाकार नाटकाच्या प्रयोगासाठी आले आहेत, तेही शासकीय कर्मचारी वसाहतीत प्रयोग करत होते. या कल्पना असूनही प्रशासनाने अधिकारपदाचा गैरवापर केला.

नाटय़ कलावंत जयंत सावरकर, गिरीश ओक यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रचंड नाराजी व्यक्त केली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या सिंधुदुर्गात कलाकारांचा सन्माम राखला नाही. त्यामुळे नाटय़ कलावंतासोबत नाटय़ रसिकदेखील नाराज झाले. या नाटकाचे आयोजन करणाऱ्यांनी कलावंताची निवासी सुविधा केली होती. त्यामुळे कलाकारांचे सामान बाहेर काढून टाकण्याचा उद्दामपणा करण्यापूर्वी सौजन्यपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकत होता.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व जिल्हाधिकारी उदय चौधरी हे चांगले मित्र आहेत. त्यामुळे कलाकारांचे सामान बाहेर काढण्याचा उद्दामपणा करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्थेची सोय होऊ शकली असती. प्रशासनाची पूर्ण जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सौजन्यता दाखविणे क्रमप्राप्त होते.

जिल्हा प्रशासनाने कलाकारांचा उपमर्द केला नाही अशा थाटात प्रत्युत्तर दिले आहे. कागदी घोडे नाचविणाऱ्यांनी कलाकार कसे चुकीचे आहेत, हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न करून कलाकार व नाटय़ रसिकांचा पुन्हा एकदा अवमान केला आहे. कलाकार कला सादर करण्यासाठी आले होते. शेखर सिंह यांचे स्नेही सरकारी कामासाठी आले होते का? असा प्रश्न निर्माण होतो.

नाटय़ कलावंत जयंत सावरकर, गिरीश ओक या कलाकारांचे वयोमान आणि कलावंताची भूमिका जाणून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. पण सिंधुदुर्ग प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याने कागदी घोडे नाचवत प्रशासनाने कलावंताना खोटे ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याबाबत जनतेत प्रचंड नाराजी आहे.

सिंधुदुर्गसारख्या पर्यटन जिल्ह्य़ात प्रशासनाने सौजन्यता दाखविली पाहिजे, पण तसे झाले नाही, त्यामुळे सिंधुदुर्गची राज्यात, कलाक्षेत्रात बदनामी झाली आहे. कलावंतांची माफी मागत सारवासारव करणाऱ्या अधिकारी आणि राजकीय नेत्यानी सिंधुदुर्गच्या परंपरेला तडा जाऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे.

जिल्हा प्रशासनाने कलाकारांचा उपमर्द केला नसल्याचे पत्रक काढून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2017 12:24 am

Web Title: tujhe aahe tujpashi marathi natak in sindhudurg
Next Stories
1 शिवसेना पक्षप्रमुखांनी डोस पाजल्यानंतर विनायक पांडे नरमले
2 बारी घाटात बसला अपघात, जीवितहानी नाही
3 ‘संजय राऊत शिवसेनेतील शकुनी मामा, पवारांच्या सल्ल्याने वागतात’
Just Now!
X