कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्याजागी  राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अद्याप बदलीबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही, असे तुकाराम मुंढेंनी म्हटले आहे. २०१६ पासून तुकाराम मुंढे यांची बदली केल्याची ही चौथी वेळ आहे.

तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकामुळे नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाची अडचण वाढली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले.  मुंढे यांनी नियमावर बोट ठेवत काम सुरुच ठेवले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या होत्या.

बुधवारी दिवसभर तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. अखेर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या बदलीच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.  मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  मुंढे यांच्या बदलीमुळे  नाशिकमधील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनात चांगले बदल घडले होते. कामकाजात सुसूत्रता आल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. मात्र, अवघ्या नऊ महिन्यांमध्येच त्यांची बदली करण्यात आली.  त्यामुळे मुंढेच्या बदलीविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

बदली आणि मुंढे
तुकाराम मुंढे यांची फेब्रुवारीमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तर त्याच्या अगोदर वर्षभरापूर्वीच त्यांची नवी मुंबईतून पुण्यात बदली करण्यात आली होती. नवी मुंबई महापालिकेत मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यापूर्वी सोलापूरमध्येही कारवाईचा धडाका सुरु ठेवल्याने २०१७ मध्ये त्यांची तिथून बदली करण्यात आली होती.