नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना प्रभारी सीईओपद देण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम पाहतील. पुढील काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे. नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपातर्फे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

शुक्रवारी, १० जून रोजी जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बळकवल्याचा आरोप आजच्या बैठकीत सिद्ध झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

३० जून रोजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविषयी केंद्र सरकारकडे लेखी तक्रार केली होती. गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांनी सीईओ पद बळकावल्याचं म्हटलं होतं. नितीन गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात केंद्र सरकारला हे पत्र लिहिलं होतं. “नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपदही त्यांनी बळकावलं आहे” या आशयाचा मजकूर गडकरी यांच्या पत्रात आहे. निविदा रद्द करणे, करोनाच्या काळात कंत्राटी कामगारांचे काम थांबवणे असे निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतल्याचंही या पत्रात गडकरींनी नमूद केलं आहे.