मंदिर प्रशासन, भाविक आणि पुजाऱ्यांतील वाद विकोपाला गेल्यामुळे मागील नऊ दिवसापासून तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या प्रक्षाळ पूजेत खंड पडला आहे. पूजेला जाण्यासाठी मंदिरातील कोणता मार्ग वापरावा यावरून हा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे शेकडो वर्षांपासून नित्य नियमाने सुरू असलेल्या प्रक्षाळपूजेत खंड पडला. यामुळे भाविक चांगलेच संतापले आहेत.

चरण तीर्थ आणि प्रक्षाळ या दोन्ही परंपरा मागील अनेक दशकापासून मंदिरात नित्य नियमाने सुरू आहेत. तुळजाभवानीचे मंदिर पहाटे उघडले जाते. त्यावेळी सर्वप्रथम तुळजापूर शहरातील काही देवीभक्त देवीची स्तुती करणारे कवणे-पदे गाऊन निद्रिस्त देवीला उठवतात. तसेच रात्री देवीला सुखनिद्रा यावी म्हणून कवणे-पदे गायली जातात, त्यानंतरच मंदिराच्या गाभाऱ्याचे दार बंद केले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून नित्याने सुरू आहे.

८ ऑगस्टला स्थानिक भक्त प्रक्षाळ पूजेसाठी जात असताना मंदिर प्रशासनाने त्यांना दर्शन मंडपातून जाण्यास सांगितल्याने पुजारी, भाविक आणि प्रशासनात वाद निर्माण झाला. हा वाद नऊ दिवसानंतरही कायम आहे. या कालावधीत कुठलीही कवणे अथवा पदे न गाता देवीची पूजा केली जात असल्याचे प्रक्षाळ पूजा करणाऱ्या भाविकांनी सांगितले. दरम्यान, मंदिर संस्थानाचे आदेश न मानणाऱ्या प्रक्षाळ पूजा करणाऱ्या १७ भाविकांना ६ महिन्यासाठी मंदिर बंदी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापकांनी बजावली आहे.

यावर मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भाविकांत आम्ही भेदभाव करणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. इतर भाविकांना ज्या रांगेतून जावे लागते त्याच रांगेतून प्रक्षाळ पूजा करणाऱयांना जावे लागेल. तसेच धर्मदाय आयुक्तांनी जो निर्णय दिला आहे, त्याचे आम्ही पालन करणार असल्याचे सांगितले. प्रक्षाळ पूजा चालू असून त्यात खंड पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.