महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या वार्षिक उत्पन्नात दरवर्षी वाढ होत आहे. मागील दहा वर्षांत ही वाढ मोठ्या झपाट्याने झाली आहे. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेली रोकड यंदा १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. ही रोकड ठेवीच्या स्वरूपात आपल्यालाच मिळावी, यासाठी अनेक राष्ट्रीयकृत बँका मंदिर समितीकडे साकडे घालत आहेत.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून येणार्‍या भाविकांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ होत आहे. विशेषतः शारदीय आणि शाकंभरी नवरात्र महोत्सव वगळता महालक्ष्मी, संक्रांत, नागपंचमी, शिवजयंती, गुढी पाडवा, दिवाळी पाडवा आणि अक्षय तृतीया या सणावारांला भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे देवीच्या दानपेटीत नवरात्रोत्सवाबरोबरच या प्रमुख सणाला देखील घसघशीत रोकड जमा होऊ लागली आहे. परिणामी तुळजाभवानी देवी यंदा १०० कोटींची धनी झाली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३० कोटींच्या घरात आहे. यात रोकड अंदाजे २० कोटी रूपयांच्या आसपास दानपेटीतून तसेच प्रशासन कार्यालयात अधिकृतरित्या जमा केलेल्या देणगीतून जमा होते. जमा झालेल्या नगदी रकमेपैकी दरवर्षी मंदिर समितीमधील अनुषंगिक खर्च आणि कर्मचार्‍यांच्या पगारावर सुमारे सहा ते सात कोटी रूपयांचा खर्च केला जातो. सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आलेले कंत्राटी २७५ कर्मचारी वगळता, मंदिर समितीच्या ७५ कर्मचार्‍यांच्या पगारीचाही यात समावेश आहे.

मागील ठेवी आणि देवीचरणी सलग दहा वर्षांत भाविकांनी अर्पण केलेली रोकड असे एकूण ९५ कोटी रूपये तुळजाभवानी मंदिर समितीकडे सध्या जमा आहेत.

यंदाच्या नवरात्रोत्सवात यात भर पडून शंभर कोटींचा आकडा नक्की पार केला जाईल, असा विश्वास मंदिर समितीच्यावतीने व्यक्त केला जात आहे. ही रोकड ठेवीच्या स्वरूपात आपल्याच बँकेला मिळावी, यासाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी तुळजाभवानी मंदिर समितीकडे साकडे घालत आहेत.