19 November 2019

News Flash

तुळजाभवानी मंदिरातील गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होणार

गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली आहे.

तुळजाभवानी देवी मंदिर

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू आणि पुरातन नाणी गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी विधानपरिषदेत याबाबत माहिती दिली.

तुळजाभवानी देवस्थानचा खजाना आणि जामदार खान्यातील अति प्राचीन ऐतिहासिक व पुरातन सोन्या-चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार व प्राचीन नाणी यांचा काळा बाजार आणि गैरव्यवहार झाल्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर आवश्यकता असल्यास या संपूर्ण प्रकरणाची सीआडीमार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी 2001 ते 2005 या कालावधीमधील संबंधित व्यक्ती, अधिकारी यांना आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलावले जाईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दरोडा टाकून रोख रक्कम आणि अन्य वस्तू नेल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 3 लाख 78 हजार 806 रुपये रोख, दोन दुचाकी, हत्यारे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मंदीरे तसेच धार्मिक स्थळावरील चोऱ्या तसेच मौल्यवान मुर्ती व दागिने यांच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत परिपत्रकाद्वारे सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. देवस्थान ट्रस्टनी सुरक्षा रक्षकांची मागणी केल्यास त्यांना महाराष्ट्र सुरक्षा दलामार्फत ती पुरवली जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

First Published on June 20, 2019 6:03 pm

Web Title: tuljabhavani temple scam cid inquiry deepak kesarkar vidhan parishad jud 87
Just Now!
X