कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची दानपेटी मोजताना मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यानेच तुळजाभवानी देवीच्या दानापेटीवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळसुत्राच्या तीन वाट्या व चार मणी लांबवल्याप्रकरणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुळजाभवानी देवीची 35 क्रमांकाची दानपेटी मोजण्याचे काम शुक्रवार दुपारी दर्शन मंडपाच्या तिसर्या मजल्यावर सुरू होते. मोजणीच्या वेळी मंदिर संस्थानचा शिपाई अनिल मनोहर साळुंके याची हालचाल संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता साळुंके याने शर्टच्या खिशात सोन्याच्या मंगळसुत्राच्या तीन वाट्या आणि चार सोन्याचे मणी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 2:55 ते 3:52 चा सुमारास घडला.
या प्रकरणी मंदिर संस्थानचे दान पेटी मोजणी इनचार्ज राजू भोसले यांच्या फिर्यादीवरून साळुंके यांच्याविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळुंके हा तुळजाभवानी मंदिर समितीचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांचा जवळचा नातलग असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान खबरदारी म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सोनाराला बोलावून सापडलेली वस्तू सोन्याची च असल्याची खात्री पटवून घेतली आहे.
दान पेटी मोजण्यास शिपाई
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची दानपेटी मोजण्यासारखे जबाबदारीचे काम शिपायाला सोपवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 9:55 am