मराठवाडय़ात १ लाख ४४ हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून

तूर खरेदीच्या वेगवेगळय़ा योजना राबवून देखील मराठवाडय़ात अजूनही एक लाख ४३ हजार ८९० क्विंटल तूर खरेदी होणे बाकी आहे. राज्य सरकारने ३१ मे पर्यंत ५८.४४ टक्के तूर खरेदी केली होती. त्यानंतर पुन्हा नाफेडच्या खरेदी केंद्रांमार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली. मात्र, अजूनही औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हय़ांत मोठय़ा प्रमाणात तूर खरेदी करणे बाकी आहे. पाऊस पडत असल्यामुळे तूर भिजण्याची शक्यताही अधिक आहे. एवढेच नव्हे तर पुन्हा एकदा हिंगोली जिल्हय़ात बारदान्याची कमतरता जाणवत आहे.

तूर लावून चूक केली, अशीच भावना मराठवाडय़ातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ज्यांची तूर विक्रीला गेली त्यांनी अन्य कोणत्याही पिकाला नीट भाव नसल्यामुळे ऊस किंवा तूर हेच दोन पर्याय निवडले असल्याचे दिसून येत आहे. मराठवाडय़ात या वर्षी उसाचे क्षेत्रही चांगलेच वधारले आहे. त्यामुळे साखर कारखाने नीट चालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तूर लावल्यानंतर ती खरेदी न झाल्याने अडचणीत सापडलेले शेतकरी नांदेड जिल्हय़ात सर्वाधिक आहेत. या जिल्हय़ात ८१ हजार २४५ क्विंटल तूर अद्याप खरेदी होणे बाकी आहे. धर्माबाद, किनवट, देगलूर आणि नांदेड येथील बाजार समित्यांमध्ये १३६८ शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे बाकी आहे. औरंगाबाद जिल्हय़ातील पैठण, गंगापूर आणि वैजापूरमध्ये ४० शेतकऱ्यांची ९ हजार ९७८ क्विंटल परभणी जिल्हय़ात ४२ हजार ५३९ क्विंटल तूर शिल्लक आहे. हिंगोली जिल्हय़ातील शेतकऱ्यांची संख्या ३४३ असून ३७ हजार २७३ क्विंटल तूर खरेदी होणे बाकी आहे.

राज्य सरकारने खरेदी केलेली तुरीची रक्कम मोठय़ा प्रमाणात देणे शिल्लक असल्याचे अधिकारी सांगतात, मात्र किती रक्कम देणे शिल्लक आहे, ही माहिती सहकार विभागाचे अधिकारी विभागीय आयुक्तांपर्यंतसुद्धा देत नसल्याची माहिती उपलब्ध होत आहे. एकतर तूर खरेदी होत नाही आणि झालीच तर त्याची रक्कमही लवकर मिळत नाही, असा अनुभव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे तूर खरेदीचे रडगाणे अजूनही कायम आहे. शेतकरी संपाच्या काळात तूर प्रश्नाकडे सरकारी यंत्रणांचे पुन्हा दुर्लक्ष झाले. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर तूर अजूनही शिल्लक आहे. बीड आणि जालना जिल्हय़ात तूर खरेदी फारशी शिल्लक नाही, मात्र अन्य जिल्हय़ांमध्ये तुरीचा प्रश्न अजूनही कायम आहे.