अन्य डाळींच्या दरातही वाढ; सणासुदीच्या काळात महाग होण्याची शक्यता

दोन वर्षांतील प्रथमच ६२ रुपये किलो इतक्या नीचांकी पातळीवर आलेला तूरडाळीचा दर पुन्हा भडकला असून दोन दिवसांत दराने शंभरी पार केली आहे. किरकोळ बाजारात शनिवारपासून तूरडाळ व हरभरा डाळीचा दर ११० रुपये किलोवर पोहोचला आहे. अन्य डाळीचे दरही भडकण्याच्या मार्गावर आहेत.

दोन वर्षांपासून सामान्याच्या ताटातील तूरडाळ गायब झाली होती. याचा विचार करून केंद्र शासनाने डाळ आयातीचे धोरण अमलात आणले. आयात डाळ बाजारात येताच व्यापाऱ्यांनी गेल्या सप्ताहात तूरडाळीची गोदामे खुली करण्यास सुरुवात केली. यामुळे लातूरच्या बाजारासह मध्य प्रदेशमध्ये तूरडाळीची विक्रीही सुरू झाली. एकाच वेळी जास्त माल बाजारात आल्याने दरही खाली आले. शुक्रवापर्यंत बाजारात तूरडाळीचा ठोक विक्रीचा दर िक्वटलला ६ हजार २०० रुपयापर्यंत खाली उतरला होता.

मात्र पुन्हा व्यापाऱ्यांनी गोदामे बंद केल्याने शनिवारपासून तूरडाळीचे दर वाढण्यास सुरुवात झाली. सोमवारी सांगलीच्या बाजारात तूरडाळीचे दर ९ हजार ८०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. तर हरभरा डाळीचा, गणेशोत्सव आणि पितृपंधरवडय़ासह दिवाळी-दसरा लक्षात घेऊन कमी झालेल्या दरात किरकोळ व्यापारीही साठा करू लागल्याने दरात िक्वटलला अडीच हजार रुपये वाढ नोंदली गेली. किरकोळ बाजारात हरभरा डाळीचा दर १२० रुपये किलोवर गेला आहे. जो गेल्या आठवडय़ात ७८ रुपयापर्यंत खाली उतरला होता.

अन्य डाळींचा वाढलेला दर..

  • मूगडाळ : ६२ वरून ७० रुपये
  • उडीद डाळ : १२० वरून १४० रुपये
  • मसूर डाळ : ६६ ते ६८ रुपये