हमालीवर आकारण्यात येणारी लेव्ही वाहतूकदारांनी देण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आल्यानंतर बुधवारी गेले ११ दिवस बंद असणारा सांगली बाजारातील हळदीचा व्यापार सुरू झाला. हमालांच्या संपामुळे हळद व्यापार बंद राहिल्याने कोटय़वधींचा व्यवहार ठप्प झाला होता. माजी मंत्री मदन पाटील यांच्या निवासस्थानी बुधवारी सर्व संबंधितांची बठक झाल्यानंतर सौदे व व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगलीच्या वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या ११ दिवसांपासून हळद व्यापार हमाल, व्यापारी व मालवाहतूकदार यांच्यात निर्माण झाल्याने विवादावरून संप सुरू होता. हमालानी बाजारात येणाऱ्या ११० ते १३० किलो वजनाची पोती उचलण्यास नकार देत हमालीचे काम करण्यास नकार दिला होता. बाजार समितीच्या नियमानुसार प्रती पोत्याचे वजन ५० ते ५५ किलो असावे अशी मागणी करीत हमालांचा संप सुरू होता. हा वाद बाजार समितीचे प्रशासक मनोहर माळी यांनी तडजोडीने मिटविला.
तथापि, हमालीवर लेव्ही कोणी द्यायची यावरून पुन्हा हमाल पंचायत, वाहतूकदार आणि व्यापारी यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याने पुन्हा हळदीचे सौदे बंद ठेवण्यात आले. मालवाहतूकदारांनी लेव्ही भरावी असे मत चेंबर्स ऑफ कॉमर्सने भूमिका घेतली होती.
या पेचप्रसंगावर बुधवारी माजी मंत्री मदन पाटील यांच्या निवासस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा, संचालक सुनील पट्टणशेट्टी, नितिन पाटील, शिवानंद नागराळ, हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम, गोिवद सावंत मालवाहतूकदारांचे प्रतिनिधी चंदू सावंत, महादेव ठोंबरे, विनायक तांबवेकर आदींच्या उपस्थितीत बठक झाली. हमालीवर ३० टक्के लेव्ही मालवाहतूकदारांनी भरावी असा निर्णय या वेळी घेण्यात आला. या निर्णयानंतर बाजार समितीतील हमालांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले असून उद्यापासून हळदीचे सौदे पूर्ववत सुरू होतील असे श्री. पट्टणशेट्टी यांनी सांगितले.
दरम्यान, बाजारातील बंदबाबत विद्यमान आ. सुधीर गाडगीळ यांनी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत, असा आरोप या वेळी एका व्यापाऱ्यांनी घेतला. या आरोपाला दुसऱ्या व्यापाऱ्याने प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये चांगलीच तू-तू झाली असल्याचे बठकीत हजर असणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.