माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा आज, रविवारी प्रचंड गोंधळात झाली. सभेपूर्वीच गाजलेल्या ‘मद्यपी’च्या मुद्यावरून सत्ताधारी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे यांनी जाहीर माफीही मागितली. दादागिरीची भाषा, फौजदारी कारवाईचा इशारा, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, निषेध, टोमणे मारणे, भ्रष्टाचाराचे आरोप, भाषणात अडथळे आणणे, असे सारे प्रकार माध्यमिक शिक्षकांच्या सभेत झाले. सुमारे अडीच तास चाललेल्या सभेत मात्र सर्व विषय मंजूर करण्यात आले.
संस्थेची ७२वी वार्षिक सभा सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत डावखर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सत्ताधारी व विरोधी परिवर्तन मंडळातील आरोप-प्रत्यारोपामुळे सभा गाजण्याची चिन्हे होतीच, त्याप्रमाणेच सभा पार पडली. अकोले शाखेतील साडेचार लाखांचा गैरव्यवहार, कमी लाभांश, कृतज्ञता निधी, मुख्य शाखेतील जादा रकमेला झालेली इन्व्हर्टरची खरेदी असे विविध विषयांवर सभेत गदारोळ झाला. विरोधकांनी त्यासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ज्येष्ठ संचालक कचरे यांनी त्याला समर्पक उत्तरे दिली तरी गेली १५ वर्षे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व ठेवून असणारे कचरे यंदा प्रथमच काही मुद्यांवर ‘बॅकफूट’ला गेलेले दिसले.
सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना दरवर्षीप्रमाणे यंदाही कचरेच उत्तरे देत होते. त्याला संतोष ठाणगे यांनी हरकत घेताच कचरे संतप्त झाले व त्यांनी ‘मी काही पाकिस्तानातून आलो का’ असे म्हणत कोणी दादागिरी करू नये, असा इशारा दिला. त्यावरून गोंधळ सुरू झाला, दोन्ही बाजूंचे सभासद उठून धावले. विरोधी परिवर्तनचे संचालक अप्पासाहेब शिंदे यांनीही त्यांना दादागिरीची भाषा वापरू नका असा प्रतिइशारा दिला. मद्यपीच्या विषयावरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांना टोमणे लगावत होते. विरोधकांच्या आरोपांनी हैराण झालेल्या कचरे यांनी ‘फिर्यादी तुम्हीच आणि न्यायाधीशही तुम्हीच असा प्रकार करू नका’, असा उद्वेगही व्यक्त केला.
संस्थेचे सचिव साहेबराव वांढेकर सक्षम नसल्याने त्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. ते इतिवृत्त वाचत असताना त्यात अडथळे आणून ते बंद पाडण्यात आले. सभासद दत्ता जाधव, सुभाष कडलग, तुषार शिंदे, जंजिरे, सुनील दानवे, श्यामराव पठारे, अजित दिवटे, मारुती लांडगे, भीमराज खोसे, नंदकुमार तोडमल, राजेंद्र लांडे, चंद्रकांत भवर, महेश दरेकर, ज्ञानदेव अकोलकर आदींनी हरकतीचे मुद्दे उपस्थित करत सूचनाही केल्या.
अकोल्यासाठी चौकशी समिती
अकोले शाखेत एका कर्मचाऱ्याने शिक्षकाच्या नावावर साडेचार लाखांचे कर्ज लाटल्याचा आरोप दत्ता जाधव यांनी केला. हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत त्याच्या चौकशीसाठी सत्ताधारी, दोन विरोधी संचालक व जाधव यांचा समावेश असलेली चौकशी समिती कचरे यांनी जाहीर केली. जाधव यांनी या कर्मचाऱ्याचे व शिक्षकाचे नाव जाहीर करण्याच्या भूमिकेवरून सभागृहात दोन गट पडले होते. दोन्ही गट त्यावरून हमरीतुमरीवर येऊन एकमेकांच्या अंगावर धावले होते. संबंधित कर्मचाऱ्याची भरती करताना पैसे घेतल्याने सत्ताधारी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप झाला.
अवाजवी दराने खरेदी
सुनील दानवे यांनी संस्थेने इन्व्हर्टरची खरेदी अवाजवी दराने झाले व त्यात संस्थेचे ७ हजार रुपयांचे नुकसान झाले. संस्थेच्या अहवाल छपाई दरातील गडबडीकडेही त्यांनी लक्ष वेधले. या विषयावरही गदारोळ झाला. त्यावर कचरे व शिंदे यांच्यात खुलासे, प्रतिखुलासेही रंगले. त्यातून सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आला. याच चर्चेत कचरे यांनी खरेदीच्या विषयात विविध प्रकारे दबाव येत असल्याचे मान्य केले.
निषेधाचा फलक आणि टोप्या
‘मद्यपी’च्या विषयावरून सभागृहाबाहेर विरोधकांनी सत्ताधारी, संस्थेचे अध्यक्ष यांचा निषेध करणारा फलक लावला होता. याच विषयावरून फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आला. सभासद तुषार शिंदे यांनी जेवणावळीवरील खर्चाचा निषेध करण्यासाठी ‘अन्नत्याग’ केल्याचा उल्लेख असणारी टोपी घातली होती, तर कर्जमर्यादा ८ लाख रु. करण्याच्या मागणीसाठी पाचही विरोधी संचालकांनी या मागणीचा उल्लेख असणाऱ्या टोप्या घातल्या होत्या.