महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर मोठय़ा प्रमाणात कासव तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून तेलंगणातील हरीमोहन हजारीदास हलदर याला ४० कासवांसह वन व पोलिस दलाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
तेलंगणातील हैदराबाद, आदिलाबाद, कागजनगर व परिसरात मोठय़ा प्रमाणात कासव आहेत. तेथील कासव महाराष्ट्रात आणून विकण्याचा धंदा कित्येक वर्षांंपासून सुरू आहे. यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मरकडा, धाबा, गोंडपिंपरी, आष्टी, अहेरी, भामरागड या सीमेलगतच्या गावात कासवांची विक्री करायची, असा हा प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस व वनाधिकाऱ्यांनी या कासव तस्करीवर लक्ष्य केंद्रित केले होते. तेलंगणातून विक्रीसाठी कासव गडचिरोलीतील मरकडय़ाला नेत असताना पोलिस व वनविभागाने संयुक्तरित्या कारवाई करून आरोपींला अटक करून ४० कासव जप्त केले. हे कासव हैदराबाद येथून आणल्याचे आरोपीने सांगितले. ही कारवाई रविवारी हिवरा गावाजवळ करण्यात आली. धाबा उपपोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर पचार, सहाय्यक उपनिरीक्षक भास्कर ढोक, नरेश शेंडे, नरेश नन्नावरे, नितेश गुडघे हे पोलीस कर्मचारी हिवरा फाटय़ावर गस्तीवर असताना या मार्गाने विनाक्रमांकाची एक दुचाकी आली. दुचाकीवर दोन पोते लटकवलेले होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता आरोपी हरीमोहन हजारीदास हलदर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता पोत्यांमध्ये ४० कासव आढळून आली. त्याला पोलिसी हिसका दाखविताचा त्याने या तस्करीची माहिती दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी वनविकास महामंडळाचे कर्मचारी पी.ए. पाटील यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पाटील यांनी सहकारी के. भांगे, व
डवरे यांच्यासह येऊन मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम ११, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी पी.ए. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.